‘कॉम्प-एक्स-२५’ला मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट : जिल्ह्यातील ७७६ ग्रामपंचायत फायबर नेटने जोडणार नागपूर : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सरकारचा समाज साक्षर करण्यावर भर आहे. ग्रामीणांना आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा मिळावा म्हणून गावापर्यंत फायबर आॅप्टिकल केबल टाकण्याचे काम सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील ७७६ ग्रामपंचायत फायबर नेटने जोडण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर डिजिटल इंडियांतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायत डिसेंबर २०१८ पर्यंत फायबर जोडणीने स्मार्ट होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. ‘व्हीसीएमडीडब्ल्यूए’च्यावतीने कस्तूरचंद पार्कवर ‘कॉम्प-एक्स-२५’ या पाच दिवसीय रौप्य महोत्सवी आयटी प्रदर्शनाचे आयोजन सुरू आहे. या प्रदर्शनाला शनिवारी मुख्यमंत्र्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी प्रदर्शनाची पाहणी केली आणि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश साबू, सचिव दिनेश नायडू, उपाध्यक्ष विनय धर्माधिकारी, कोषाध्यक्ष प्रशांत बुलबुले आणि प्रदर्शनाचे प्रायोजक व इंटेक्स कंपनीचे सुपर डीलर सोनू केवलरामानी यांच्यासह असोसिएशनचे अन्य पदाधिकारी, सदस्य आणि प्रेक्षक उपस्थित होते. प्रदर्शन अखेरचे दोन दिवस आयटी प्रदर्शन अखेरचे दोन दिवस सुरू राहील. प्रदर्शनात लोकांची गर्दी आहे. शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने भेट देऊन नामांकित कंपन्यांच्या उत्पादनांची माहिती घेत आहेत आणि नोंदणी व खरेदी करीत आहेत. विशेषत: युवक नवीन तंत्रज्ञानाच्या आयटी उत्पादनांची माहिती घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत. संगणकाच्या इतिहासाची माहिती देण्यासाठी डोममध्ये म्युझियम तयार केले आहे. दरदिवशी वेगवेगळ्या विषयावर आयोजित चर्चासत्रात तज्ज्ञ आयटी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचे विश्लेषण करीत आहेत. याशिवाय ‘माझी मेट्रो’ आणि राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ पोर्टल संदर्भात डोममध्ये माहिती देत आहेत. मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी प्रदर्शनाला भेट देऊन आयटी उत्पादनांची माहिती घेतली. अनेक स्टॉलवर उत्पादन खरेदीसाठी सवलतीच्या योजना आहेत. (वा.प्र.) शहर आणि गावातील अंतर कमी होणार फायबर जोडणीने गावागावात इंटरनेटची सुविधा पोहोचल्यानंतर शहर आणि गावातील अंतर कमी होणार आहे. त्यामुळे ग्रामीणांचा जीवनस्तर सुधारेल. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रगती तंत्रज्ञानाची माहिती मिळेल. डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न सर्वप्रथम महाराष्ट्र पूर्ण करणार आहे. यासाठी सरकार सर्वस्तरावर प्रयत्न करीत आहे. त्यामुळे साक्षर समाजाच्या निर्मितीसह सर्व ग्रामपंचायत फायबर नेटने जोडल्यानंतर शाळा आणि आरोग्य सेवा स्मार्ट होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रत्येक ग्रामपंचायत २०१८ पर्यंत स्मार्ट होणार
By admin | Updated: January 15, 2017 02:22 IST