नागपूर : ‘सीबीएसई’चा दहावीचा निकाल म्हटला की शहरातील अनेक शाळांमधील शिक्षकांची धावपळ होते, परंतु त्यातदेखील एक समाधान असते. परंतु यंदा जाहीर झालेल्या निकालांदरम्यान शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. संथ संकेतस्थळामुळे निकाल कळायला झालेला उशीर अन् त्यानंतर निकाल ‘ग्रेड’ प्रणालीनुसार जाहीर झाल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सामोरे जाताना शिक्षकांच्या नाकीनऊ आले. अनेक शाळांमध्ये सायंकाळपर्यंत निकालासंदर्भातील काम सुरूच होते.‘सीबीएसई’ने गुरूवारी दुपारी २ वाजता दहावीच्या निकालाची घोषणा केली. दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत तर संकेतस्थळ अतिशय संथ सुरू होते. त्यामुळे नेमका निकाल कसा ‘डाऊनलोड’ करावा, असा प्रश्न शाळांना पडला होता. अनेक विद्यार्थीदेखील शाळांना विचारणा करीत होते. परंतु काही वेळ तर संकेतस्थळच उघडत नव्हते. शाळानिहाय निकाल पाहण्यासाठी शिक्षकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली.ज्यावेळी शाळांनी व विद्यार्थ्यांनी निकाल पाहिला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. दरवर्षीच्या परंपरेला छेद देत ‘सीबीएसई’ने गुणांऐवजी ‘सीजीपीए’ (क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉर्इंटस् अॅव्हरेज) दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. नेमके गुण किती हा प्रश्न विद्यार्थी, पालक व शिक्षकांना पडला होता. अनेक शाळांतील प्राचार्यांनादेखील ‘सीजीपीए’ला गुणांत कसे सांगायचे, याची माहितीच नव्हती. काही प्राचार्यांनी ‘सीबीएसई’च्या अधिकाऱ्यांनाच थेट संपर्क केला व नेमकी स्थिती जाणून घेतली. तेथून मिळालेल्या माहितीनुसार शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या ‘सीजीपीए’नुसार टक्केवारी काढण्यासाठी ‘फॉर्म्युला’ दिला.(प्रतिनिधी)४०० हून अधिक विद्यार्थ्यांचा ‘सीजीपीए’ १०दरम्यान, शहरातील अनेक शाळांमध्ये १० ‘सीजीपीए’ असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या उल्लेखनीय आहे. शहरातील चारशेहून अधिक विद्यार्थ्यांना १० ‘सीजीपीए’ मिळाला आहे. यात भवन्स बी.पी. विद्यामंदिर, सेंटर पॉर्इंट, मॉडर्न स्कूल, संजुबा हायस्कूल, सेंट पॉल स्कूल, सेंट झेव्हिअर्स स्कूल या शाळांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ९.६ ते ९.८ दरम्यान मोठ्या विद्यार्थ्यांना ‘सीजीपीए’ आहे.
संथ संकेतस्थळामुळे मनस्ताप : ‘ग्रेड’मुळे संभ्रम निकालाची डोकेदुखी
By admin | Updated: May 29, 2015 02:16 IST