सुरक्षा रक्षकांची धावपळ : पोलिसांनी घेतले ताब्यात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दारूच्या नशेत एका तरुणीने गोंधळ घातल्याने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी धावपळ झाली होती. सुरक्षा रक्षकांनी तिला आवरून पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रियंका नामक ही तरुणी अंधेरी मुंबई येथील रहिवासी असल्याचे समजते. ती ७ मे रोजी एका ग्लोबल कॉन्फरन्सच्या निमित्ताने नागपुरात आली होती. आज परत जात असताना ती दारूच्या नशेत विमानतळावर पोहचली. सूत्रांच्या माहितीनुसार, तिला इंडिगोच्या विमानाने मुंबईला जायचे होते. ती दारूच्या नशेत असल्याचे लक्षात येताच विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यामुळे तिने विमानतळावर चांगलाच गोंधळा घातला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सुरक्षा रक्षकांनी तिला सोनेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर तिचे काय झाले कळायला मार्ग नाही. रात्री उशिरापर्यंत याबाबत सोनेगाव पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती.
दारूच्या नशेत तरुणीचा विमानतळावर गोंधळ
By admin | Updated: May 13, 2017 02:38 IST