नागपूर : जून संपत आला तरी मृगाचा पाऊस बरसला नाही. त्यामुळे राज्यभर जलसंकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी नागपूरकरांना आताच चिंता करण्याची गरज नाही. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह व नवेगाव खैरी या दोन्ही जलाशयात मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. या दोन्ही जलाशयांमध्ये जवळपास चार महिने पुरेल एवढा साठा आहे. त्यामुळे नागपुरात सध्यातरी कुठल्याही प्रकारची पाणीकपात होण्याची शक्यता नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही बाब नागपूरकरांना दिलासा देणारी आहे. तोतलाडोह जलाशयातून नवेगाव खैरी जलाशयात पाणी सोडले जाते. तेथून पाणी कन्हान येथे आणले जाते. कन्हानमध्ये पंपिंग करून पाणी गोरेवाडा तलावात पोहचविले जाते. तेथून राजभवन टाकीला पुरवठा करून शहरात सर्वत्र वितरित केले जाते. तोतलाडोह येथे ४६६ दलघमी म्हणजे क्षमतेच्या ४५ टक्के जलसाठा आहे. नवेगाव खैरीमध्ये १६३ दलघमी म्हणजे ९१ टक्के जलसाठा आहे. नागपूर शहराला दररोज ६५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. पाणी पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी महापौर अनिल सोले यांनी बैठक घेतली. तीत उपमहापौर जैतूनबी अंसारी, आ. सुधाकरराव देशमुख, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, आयुक्त श्याम वर्धने, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे, रमेश शिंगारे उपस्थित होते. बैठकीनंतर सुधाकर कोहळे यांनी सांगितले की, गोरेवाडा तलावातील जलस्तर कमी होण्यासाठी आरेंजसिटी वॉटर वर्क (ओसीडब्ल्यू) महादुला येथे अनियमित वीज पुरवठा होत असल्याचे कारण देत आहे. वास्तविकता गोरेवाडा तलावाच्या गेटमध्ये कचरा फसल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. संबंधित प्रकरणी महापौरांनी ओसीडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांना फटकारल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पिण्याच्या पाण्याची चिंता नाही
By admin | Updated: June 28, 2014 02:36 IST