स्टेज क्रॉफ्ट अड्डा : चिटणवीस सेंटरचे आयोजन नागपूर : मानवी आयुष्याच्या गरजा पूर्ण करतानाच बाजार आमच्या भावना, संवेदनांचीही विक्री करायला लागला, पण ते आम्हाला कळलेच नाही. आमच्या धार्मिक श्रद्धाही आता स्पॉन्सर होत आहेत. एकूणच मानवी जीवनातील मूल्यांची पडझड होत असताना त्यात बाजार मानवाचे जगणे नियंत्रित करतोय की नष्टच करतोय. या जगात आता माणसे उरली आहेत की फक्त ग्राहकच आहेत, असा मूलगर्भ विचार करायला लावणारा ‘एफडीआय’ हा नाट्यप्रयोग आज चिटणवीस सेंटरच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. चिटणवीस सेंटरच्यावतीने ‘स्टेज क्राफ्ट अड्डा’ हा नवा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात ‘फोर वन अँक्ट कॉमेडीज’ सदरात आज चार विनोदी एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. ‘एफडीआय’ या एकांकानंतर ‘बिझनेस अँड युज्युअल’, ‘मॅरेज प्रपोजल’ आणि ‘हसना मना है’ अशा चार हिंदी व इंग्रजी एकांकिका सादर करण्यात आल्या. नवोदित कलावंतांना रंगमंच उपलब्ध व्हावा आणि केवळ रंगमंच उपलब्ध करून देतानाच नाटकांचा विचार करणारा नवा प्रेक्षकवर्ग तयार करण्यासाठी चिटणवीस सेंटरने या उपक्रमाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. त्याच अनुषंगाने गेल्या काही काळापासून या केंद्रात विविध कलाप्रकारांना रसिकाभिमुख केले जात आहे. त्यातूनच नव्या रसिकांची निर्मिती होते आहे. आज रुपेश पवारच्या नेतृत्वात राष्ट्रभाषा परिवारच्या चमूने ‘मुगलो ने सल्तनत बख्श दी (एफडीआय)’ या एकांकिकेने उपक्रमाची सुरुवात झाली. या व्यंगात्मक एकांकिकेत मोगलांनी मागचा पुढचा विचार न करता इंग्रजांना भारतात जागा दिली. शहाजहानने दिलेल्या शब्दाला पाळताना येणार्या प्रत्येक पिढीला हतबल व्हावे लागले आणि हळूहळू संपूर्ण भारत पश्चिमेच्या कब्जात गेला. नंतरच्या काळात विदेशी कंपन्यांच्या हातातले बाहुले बनून आज आपण आपल्याच संस्कृतीला विसरत चालल्याची समीक्षा अत्यंत विनोदी ढंगाने एकांकिकेतून सांगण्यात आली. यात नासिर शेख, स्नेहा, आकाश, तुषार, आश्लेष यांनी भूमिका केल्या. त्यानंतर अनुज हॅमिल्टनच्या ‘बिझनेस अँज युज्युअल’, आरजे रॉकीचे ‘मॅरेज प्रपोजल’ आणि वरुण विज यांची ‘हसना मना है’ या एकांकिका सादर झाल्या. या एकांकिकांचा रसिकांनी मनमुराद आस्वाद लुटला. यावेळी ज्येष्ठ नाटककार विकास खुराणा उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बाजारीकरणाचा पगडा व्यक्त करणारे नाट्य
By admin | Updated: June 9, 2014 01:23 IST