दीपरंग नाट्य महोत्सव : बौद्ध रंगभूमीतर्फे प्रयोग नागपूर : प्रचंड लोकप्रियता लाभलेल्या लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर अशा कलावंतीणीच्या आयुष्याबद्दल सर्वसामान्य लोकांना तर कायमच उत्सुकता आणि समज-गैरसमजही असतात. अगदी लहान वयापासून पायात घुंगरू बांधून त्यांनी केलेली कष्टप्रद नृत्यसाधना, हजारोंच्या संख्येतील दर्शकांना नादावून टाकणारे त्यांच्या तमाशांचे फड, सरकारीदरबारी त्यांना लाभलेले बहुमूल्य पुरस्कार अशा अनेकविध घटनांवर प्रकाश टाकणारे या नाट्याचे सर्वांगसुंदर सादरीकरण दीपरंग नाट्य महोत्सवात करण्यात आले. हा महोत्सव अ.भा.मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. विठाबार्इंना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार लाभला. भारत-चीन युद्धाच्या वेळी सीमेवरील जवानांसाठी त्यांनी मनोरंजनाच्या माध्यमासह प्राणपणाने सेवा दिली. त्याच विठाबार्इंच्या जीवनावर आधारित हे नाट्य बौद्ध रंगभूमीतर्फे सादर करण्यात आले. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन संजय जीवने यांनी केले. कलावंतांच्या उत्कृ ष्ट अभिनयासह, वेधक लावणी नृत्य, मधुर गायन-वादन व अनुरूप नेपथ्यासह उपस्थितांची दाद घेणारे हे नाट्य होते. विठाबार्इंच्या सुख-दु:खांवरही समर्पक प्रकाश टाकणारे वंदना जीवने यांचे अनुभव कथन आणि सांची जीवने यांचा अभिनय ही नाटकाची जमेची बाजू होती. सांचीने बहारदार लावणी नृत्याच्या माध्यमातून सकस अभिनयाने विठाबार्इंचे आयुष्य साकारले. सोना बहुरूपी यांचे श्रवणीय संगीत संयोजन व सोना बहुरूपी, भूषण जाधव, मोनिका भोयर यांचे मधुर लावणी गायन, मनीष पाटील व रोशन श्रीवास्तव यांचे नृत्य दिग्दर्शन, नाना मिसाळ व सुनील हमदापुरे यांचे नेपथ्य यामुळे नाटकाची उंची वाढली. सुरेंद्र आवळे निर्मित या नाटकाने वेगळ्या वास्तववादी विषयाचे सादरीकरण केले. संजय जीवने, ललित गायकवाड, अभिजित मून, मिलिंद कोटंबे, भोजराज हाडके, हरीश गवई, संदीप मून, उज्ज्वल भगत, अनिकेत कांबळे, सदिच्छा जिलटे, लुंबिनी आवळे, गौरी सोनटक्के, रतिका बावणे, रूपाली कांबळे, प्राची जवादे व सावळा आणि मावशीच्या अफलातून भूमिकेत रोशन श्रीवास्तव यांच्या अभिनयाने रंगत आणली. प्रकाशयोजना मिथून मित्रा यांची होती. रंगभूषा बाबा खिरेकर, वेशभूषा प्रीती तुपे यांच्यासह मनोज रंगारी, प्रमोद कोटंबे, सायली तुपे, प्रणिता जांगळेकर, बानाई यांचे सहकार्य होते. यावेळी डॉ. प्रदीप, सरोज आगलावे, संजय काशीकर, अनिल पालकर, पाटील, श्रद्धा तेलंग उपस्थित होते.(प्रतिनिधी)
सर्वांगसुंदर सादरीकरणाचे नाट्य ‘विठाबाई’
By admin | Updated: November 4, 2014 01:02 IST