राज्य शासनाचे आश्वासन : श्याम हॉटेल येथे धम्मक्रांती स्मृतिकेंद्र उभारण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचावेत यासाठी पटवर्धन मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी भवन उभारण्यात येईल. यासाठी शासनाकडून पुढाकार घेण्यात येईल व प्रसंगी विशेषाधिकाराचा वापरदेखील करण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिले. या मैदानावर हे भवन उभारण्यात यावे ही मागणी गेल्या २३ वर्षांपासून करण्यात येत आहे. प्रकाश गजभिये, प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला. नागपूर महानगरपालिकेने ३१ डिसेंबर १९९२ रोजी यशवंत स्टेडियम समोरील पटवर्धन मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भव्य सांस्कृतिक भवन निर्माण करण्याचा ठराव मंजूर केला होता.न्यायालयाच्या आदेशानुसार अडथळे दूर होणारनागपूर : जागा मिळावी यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु यानंतर विविध प्रशासकीय अडथळे यात गेले व सातत्याने मागणी करूनदेखील ही जागा मिळाली नव्हती. या जागेचा वापर महानगरपालिकेतर्फे इतर प्रयोजनासाठी होत असल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिकादेखील दाखल करण्यात आली होती. या जनहित याचिकेमधील अंतरिम आदेश, विविध निवेदने विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी २०१० साली या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणाबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. न्यायालयीन आदेशाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शताब्दी भवनाच्या बांधकामातील सर्व प्रशासकीय अडथळे दूर करण्याचे निर्देश नगरविकास खात्याला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेचा मुद्दा शताब्दी भवनाशी निगडित नसल्यास राज्य शासनाकडून सर्व प्रशासकीय अडथळे दूर करुन हे भवन लवकरात लवकर बांधण्यात येईल, असे खडसे यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
पटवर्धन मैदानावर डॉ.आंबेडकर शताब्दी भवन उभारणार
By admin | Updated: December 19, 2015 02:54 IST