नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा नागपूर जिल्ह्यातील १२२ केंद्रांवर सुरू आहे. यातील १२० केंद्रांवर कोविशिल्ड तर दोन केंद्रावर कोव्हॅक्सिन लस दिली जात होती. शनिवारपासून कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या केंद्राने कोव्हॅक्सिन केंद्राची भर पडली. पालकमंत्री नितीन राऊत यांनी लस घेऊन या केंद्राचे उद्घाटन केले. आज शहरात ११२०७ तर ग्रामीणमध्ये ६५१३ लाभार्थींचे लसीकरण झाले.
नागपूर जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला आहे. शहरात केंद्रांची संख्या वाढवून ६२ करण्यात आली. शिवाय रात्री १० पर्यंत लसीकरण सुरू राहत असल्याने याचा फायदा लाभार्थींना होत आहे. शनिवारी ११२०७ लाभार्थींनी लस घेतली. यात पहिला डोस घेतलेले ९५१ हेल्थ वर्कर, ७०२ फ्रंट लाइन वर्कर, ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेले २४६८ तर ६० वर्षांवरील ६१७८ ज्येष्ठांचा समावेश होता. याशिवाय ९०८ लाभार्थींनी दुसरा डोस घेतला. ग्रामीणमध्ये ६१ केंद्रांवर पहिला डोस घेणाऱ्यांमध्ये २७४ हेल्थ वर्कर, ४०९ फ्रंट लाइन वर्कर, ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेले १०२४ तर ६० वर्षांवरील ४३५५ ज्येष्ठ होते. याशिवाय, ४५१ लाभार्थींनी दुसरा डोस घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्रात आजपासून लसीकरणाला सुरुवात झाली. यामुळे शहरात कोव्हॅक्सिनची तीन केंद्रे झाली. येथे पहिल्याच दिवशी ३४ लाभार्थींनी डोस घेतला. यात १३ ज्येष्ठ नागरिक होते. या भागात हे एकमेव केंद्र असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्घाटनाच्या दरम्यान मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. आंबेडकर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवी चव्हाण उपस्थित होते.