हवाला व्यावसायिकांचा जोडधंदा : डब्ब्यातील गुपित बाहेर नरेश डोंगरे नागपूरहजारो कोटींच्या डब्बा व्यापाराचे झाकण फुटताच डब्ब्यात बंद असलेल्या अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या आहेत. एकीकडे मोठमोठ्या उद्योग, व्यापाराच्या आडून डब्ब्याची सट्टेबाजी खेळली-खेळवली जात असल्याचे उघडकीस आले आहे. दुसरीकडे अनेक हवाला व्यावसायिक जोडधंदा म्हणून डब्ब्याचा व्यापार करीत असल्याचेही पुढे आले आहे. त्यातूनच धनिक मंडळी आणि व्यापाऱ्यांची सट्टेबाजी चालविणारा ‘डब्बा नोटांच्या पोत्यात बंद’ असल्याचे आता उघड झाले आहे. डब्ब्यातील हारजीतची रोकड हवाला व्यावसायिकांच्या माध्यमातूनच इकडून तिकडे केली जाते. त्याचे कमिशन आणि डब्ब्याची दलाली असा दुहेरी लाभ पदरात पाडून घेण्यासाठी काही हवाला व्यावसायिकांनी डब्बा व्यापाराचा जोडधंदा सुरू केल्याची माहिती आहे. गुन्हा दाखल झालेल्यांशी संबंधित अनेक जण गांधीबाग, इतवारीतून हवालाचा व्यवसाय करतात. हवालापेक्षाही जास्त कमिशननागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गायत्री लोक अपार्टमेंटमध्ये गुरुवारी पोलिसांनी धाड घालून सचिन ठाकूरमल अग्रवाल या डब्बा व्यापाऱ्याला अटक केली. त्या इमारतीत हवालाचा मोठा व्यवसाय चालतो, हे आठ वर्षांपूर्वीच उघड झाले होते. हवालाची ही रोकड लुटण्यासाठी उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगारांनी हवाला व्यावसायिक लखोटिया बंधूंची निर्घृण हत्या केली होती. हे प्रकरण देशभर गाजले होते आणि याच प्रकरणातून हवालाच्या नागपुरातील व्यापाचाही खुलासा झाला होता. हत्याकांडानंतर त्यावेळी या इमारतीत पोहचलेल्या पोलीस आणि पत्रकारांना बंदुकीच्या गोळ्या, रक्ताचा सडा आणि नोटांचे बंडल दिसले होते. गुरुवारी पोलिसांना येथे काय काय दिसले ते कळायला मार्ग नाही. मात्र, अग्रवाल सोबतच पोलिसांनी गांधीबागमधील हॅन्डलूम मार्केटमध्ये मितेश सुरेशकुमार लखोटिया याला पकडल्याने हवाला व्यावसायिक डब्ब्याचा जोडधंदा करीत असल्याचे चर्चेला आले आहे. हवालापेक्षाही डब्बा अनेकपट जास्त कमिशन देतो. कारण रोजच डब्ब्याचा व्यापार चालतो. रोजच हजारो कोटींची उलाढाल होते. त्यामुळे कमिशनही तगडेच मिळते. हम तो डुबेंगे सनम...राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या या गोरखधंद्याचा उलगडा पोलिसांनी नव्हे तर कुशल लद्दड या ब्रोकरनेच केला आहे. शक्य ते सर्व प्रयत्न करूनही वीणा सारडा या महिलेकडून ८ ते ९ कोटींची कमिशनची रक्कम मिळत नसल्याने डबघाईला आलेल्या कुशलनेच डब्बा फोडला. आपल्या सर्व सह-व्यावसायिकांना माहीत असूनही आपली रोकड मिळवून देण्यासाठी ते मदत करीत नसल्याने तसेच वीणा सारडाला डाव खेळण्यास प्रोत्साहित करीत असल्याने हताश झालेल्या कुशलने ‘हम तो डुबेंगे सनम...तुमकों भी ले डुबेंगे’, अशी भावना करून घेत स्वत:च पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर बारीकसारीक माहितीही नोंदवली अन् डब्ब्याचे झाकण नव्हे तर पूर्ण डब्बाच फोडला. पोलिसांकडून मानाचे पानडब्बा व्यापाराशी जुळलेली मंडळी महिन्याला १० लाखांपासून ५० लाखांपर्यंतचे कमिशन पदरात (पोत्यात) पाडून घेतात. प्रचंड पैसा मिळवणारी ही मंडळी पोलिसांशी मधूर आणि मानाचे संबंध ठेवून असल्याचे वास्तवही कारवाईनंतर उजेडात आले आहे. हॉटेलमधील आदरातिथ्य, लॉनमधील स्वागत अन् रस्त्यावरची नजरेत भरणारी मदतही डब्बा व्यापारी पोलिसांना करतात. या व्यापाऱ्यापैकी एल-७ ग्रुपच्या संचालकाने नागपूर पोलिसांना रस्त्यावर लावण्यासाठी बॅरिकेटस् देऊन एकीकडे पोलीस अधिकाऱ्यांकडून मानाचे पान मिळवले आहे. दुसरीकडे ठिकठिकाणी नागपूर शहर पोलिसांशी आपले नाव जोडून कारवाईसाठी नजर रोखणाऱ्यांवरही डोळा रोखला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी एल-७ ग्रुपच्या रवी अग्रवालकडील कारवाईच्यावेळी त्याच्या निकटवर्तीयांनी ‘साहेबांशी असलेल्या स्नेह-संबंधांचा’ उल्लेख करून आपल्या मदतीचीही आठवण करून दिल्याचे पुढे आले आहे.
डब्बा नोटांच्या पोत्यात बंद
By admin | Updated: May 14, 2016 03:01 IST