नागपूर : मेडिकलमधील फिजिओथेरपी विभागातील सहायक प्राध्यापिकेच्या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. तो मी नव्हेच असे दाखविणारा डॉक्टर पतीच यात आरोपी निघाला. पत्नीवरील चारित्र्याच्या संशयावरून त्याने तिची हत्या केली. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.
मेडिकलमध्ये फिजिओथेरपी विभागात असिस्टंट प्रोफेसर असलेल्या अर्चना अनिल राहुले (५०, रा. प्लॉट नं. ६७, लाडेकर ले-आउट, हुडकेश्वर) रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दुर्गंधीयुक्त मृतदेह तिच्या घरात आढळल्यामुळे शनिवारी सायंकाळी खळबळ होती. त्यांच्या डोक्यावर रॉड मारून खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात आढळले होते. अर्चनाचा पती डॉ. अनिल हा रायपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. त्याने शनिवारी सायंकाळी नागपुरात आल्यावर अर्चना यांचा मृतदेह दिसल्याचा दावा केला होता.
मात्र पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता अनिल हा मागील चार ते पाच महिन्यांपासून डॉ. अर्चना यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. ते वारंवार त्यांच्याशी वाद घालायचा व त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकीदेखील दिली होती. अर्चना यांनी त्यांच्या बहीण डॉ. निमा सोनारे यांना तसे फोनवर व प्रत्यक्ष भेटूनदेखील सांगितले होते. तो शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घरी आला व अर्चना यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने बाहेर जाऊन परत येण्याचे नाटक केले. डॉ. निमा यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डॉ. अनिलला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
पोलिसांची केली दिशाभूल
डॉ. अनिल हा आठवड्यातून एक-दोन दिवस नागपुरात येत होता व दरवेळी वाद घालत होता. त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर बनाव रचला. त्याने अगोदर आरडाओरड करत शेजाऱ्यांना माहिती दिली व त्यांनी पोलिसांना बोलावले. मात्र अर्चना यांच्या बहिणीने दिलेल्या माहितीमुळे तो अडकला.