नागपूर : आयुर्वेदातील अनेक डॉक्टर आपल्या नावाखाली व दवाखान्याच्या फलकावर, ‘एमडी.’ ‘एमएस.’ लिहितात. यातच आता आयुर्वेद विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांना परवानगी देण्यात आली. यामुळे सामान्य रुग्णांचे गैरसमज होण्याची अधिक शक्यता आहे. याला गंभीरतेने घेत ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ने (एमएमसी) अॅलोपॅथीच्या सर्व डॉक्टरांना ‘एमबीबीएस’ ही पदवी लिहिण्याचा सूचना केल्या आहेत.
आयुर्वेद विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणात ५८ अॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. परंतु अॅलोपॅथीमध्ये सर्जन होण्याआधी विविध विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकाचे शिक्षण देणे आणि वरवरचे तंत्र शिकवून शस्त्रक्रियेस परवानगी देणे धोक्याचे ठरु शकते, अशी भूमिका ‘आयएमए’ने घेऊन आंदोलन हाती घेतले आहे. याच धर्तीवर ‘एमएमसी’ने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
‘एमएमसी’चे उपाध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी यांनी ‘लोकमत’ला सांगितले, अॅलोपॅथीच्या सर्व डॉक्टरांनी पहिली पदवी म्हणजे ‘एमबीबीएस’ लिहावे त्यानंतर ‘एमडी.’, ‘एमएस.’चा उल्लेख करावा, अशा सूचनांचे पत्र ‘एमएमसी’ने काढले आहे. यामुळे रुग्णांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही. यातून कोण डॉक्टर एमबीबीएस आहे आणि कोण आयुर्वेदिक आहे, ते कळेल. या शिवाय, आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये अॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी सेवा देऊ नये, अशी सूचनाही पत्रातून करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत, आयुर्वेद विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या राजपत्रित ‘सीसीआयएम’च्या अधिसूचना मागे घेण्याच्या निर्णयाचे पत्र मंत्रिमंडळाकडे पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे डॉ. रुघवानी यांनी सांगितले.