नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू आहे. शिवाय, सुपर स्प्रेडर्स असलेल्यांचाही लसीकरणात समावेश करण्यात आला आहे. यामुळे दैनंदिन लसीकरणांची संख्या ३५ हजारांवर जात आहे. लसीकरणाची संख्या वाढत असताना लस घेण्याच्या आधी आणि नंतर मद्यपान करावे की नाही याबाबत ‘व्हाॅट्सअॅप’वर गैरसमज पसरविणारे मेसेज फिरत आहेत. तज्ज्ञांनुसार, लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर काही दिवस मद्यपान न करणे हिताचे ठरते.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. यात ‘हेल्थ वर्कर’ला प्राधान्य देण्यात आले. १५ फेब्रुवारीपासून फ्रंट लाइन वर्करचे लसीकरण व दुसरा डोस देणे सुरू झाले. १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण हाती घेण्यात आले. आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. सोबतच दुसरा डोस दिला जात असल्याने लसीकरणाची संख्या वाढली आहे. सुरुवातीला लसीकरणाबाबत असलेले गैरसमज आता मागे पडले आहेत. परंतु मोठ्या संख्येत लसीकरण होत असल्याने लस घेण्याच्या किती दिवसांपूर्वी आणि लस घेतल्यानंतर किती दिवसांनंतर मद्यपान करता येईल, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत सोशल मीडियावर गैरसमज पसरविणारे मेसेज फिरत असल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.
- अल्कोहोल रोगप्रतिकारशक्ती कमी करते - डॉ. मिश्रा
मेयोच्या श्वसनरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विद्यानंद मिश्रा म्हणाले, मद्यपानापासून दूर राहण्याचा माझा सल्ला आहे. भारतात लसीकरण आणि मद्यपान यावर अभ्यास झालेला नाही. परंतु रशियातील काही तज्ज्ञांद्वारे कोरोनाची लस घेण्याआधी आणि नंतर अल्कोहोलपासून लांब राहण्याबाबत म्हटले आहे. अल्कोहोलचा प्रतिकारशक्तीवर वाईट परिणाम होतो आणि अल्कोहोल रोगप्रतिकारशक्ती कमी करते. कोरोना लस ही रोगप्रतिकारशक्तीवर काम करते. दुसरा डोस घेतल्यानंतर साधारण १५ दिवसांत रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर १५ दिवस मद्यपान करू नये.
-मद्य घेण्याचा व लसीकरणाचा संबंध नाही - डॉ. शिंदे
संसर्गजन्य आजार विशेषज्ञ डॉ. नितीन शिंदे म्हणाले, लसीकरण झाल्यानंतर त्यांनी मद्यपान केले तर अँटिबॉडीजवर परिणाम होतो, असे संशोधन कुठे पाहण्यात आलेले नाही. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे मद्य घेण्याचा लसीच्या परिणामकारकतेशी काही संबंध आहे, असे वाटत नाही. सर्वांचे लसीकरण हेच या वेळेस महत्त्वाचे आहे.