कार्यालयात गोंधळ : महापौर कक्षाला लावावे लागले कुलूपनागपूर : शहरात व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सोमवारी पुन्हा एकदा अपंगांनी सिव्हिल लाईन्समधील महापालिकेच्या कार्यालयात गोंधळ घातला, तोडफोड केली. महापौर कक्षासमोर खिडकीच्या काचा फोडल्या. ही परिस्थिती पाहता सुरक्षा रक्षकांना महापौरांच्या कक्षाला कुलूप लावावे लागले. यानंतरही अपंग थांबले नाहीत. महापालिकेतच प्रवेशद्वारासमोर धरणे देण्यास बसले. तब्बल दोन तास गोंधळ सुरू होता. पोलीस आल्यानंतर प्रकरण शांत झाले. रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर, आठवडी बाजाराच्या ठिकाणी गठई कामगारांप्रमाणेच अपंगांनाही व्यवसायासाठी जागा देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून अपंग बांधव करीत आहेत. या मागणीसाठी विदर्भ विकलांग संघर्ष समितीने आजवर बऱ्याचदा महापालिकेत आंदोलने केली आहेत. अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी अपंगांनी महापालिकेत कच्चा चिवडा विकण्याचे दुकानही लावले होते. मात्र, महापालिका वेळोवेळी नियमावर बोट ठेवून हा विषय टाळत आहे. विदर्भ विकलांग संघर्ष समितीचे अध्यक्ष गिरधर भजभुजे यांच्या नेतृत्वात सोमवारी अपंगबांधव महापालिकेत धडकले व आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर ते परतले. (प्रतिनिधी)
संतप्त अपंगांनी केली महापालिकेत तोडफोड
By admin | Updated: July 1, 2014 00:58 IST