लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टॅंकरचे पाणी भरताना झालेल्या वादानंतर चौघांनी एका तरुणाच्या घरावर हल्ला करून त्याला बेदम मारहाण केली. यात सूरज जितेंद्र भैसारे (वय २७) जबर जखमी झाला, तर कलमन्यात कुत्रा अंगावर धावल्यानंतर झालेल्या वादातून दोघांनी एकावर चाकूहल्ला केला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाबा दीपसिंह नगरात सूरज भैसारे आणि आरोपी स्मित बबन गौरकर हे शेजारी राहतात. येथे पाण्याची टंचाई असल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा केला जातो. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास पाण्याचा टँकर आला असता सुमित आणि अभिजित बबन गौरकर यांच्या आईच्या हातातून सूरजने पाण्याचा पाईप हिसकावून घेतला. त्यामुळे त्या खाली पडल्या. यावरून झालेल्या वादानंतर आरोपी स्मित तसेच अभिजित आणि रोहित राजे शाहू तसेच निशांत ऊर्फ अक्षय विकास मेश्राम हे आरोपी सूरजच्या घरावर चालून आले. त्यांनी घरात शिरून सूरजला हातबुक्कीने, प्लास्टिकच्या पाईपने तसेच ट्यूबलाईटने जोरदार मारहाण केली. त्यात तो जबर जखमी झाला. शेजारची मंडळी धावली आणि आरोपीच्या तावडीतून त्याला सोडविले. त्याने नंतर कपिलनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली.
दुसरी प्राणघातक हल्ल्याची घटना कळमन्यात घडली. नितीन भीमराव जांभुळकर तसेच दुर्गेश रामराव लिखितकर हे दोघेही कळमन्यातील मां बमलेश्वरी नगरात राहतात. दुर्गेशचा कुत्रा शुक्रवारी रात्री ८.३० वाजता नितीनच्या अंगावर धावला. त्याने चावण्याचा प्रयत्न केल्यामुळे नितीनचे दुर्गेश तसेच त्याचा भाऊ अल्केश सोबत भांडण झाले. त्यामुळे नितीनचे वडील भीमराव जांभुळकर वाद सोडविण्यासाठी आले असता आरोपी अल्केशने घरातून चाकू आणून भीमराव जांभुळकर यांना चाकूने गंभीर जखमी केले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून कळमना पोलिसांनी आरोपी अल्केश तसेच दुर्गेश लिखितकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---