शरीरावर कापल्याच्या जखमा : डोळे व गुप्तांग बेपत्तावर्धा : येथील गांधीनगर परिसरात असलेल्या विकास विद्यालयाच्या मागच्या आवारात शनिवारी रात्रीपासून बेपत्ता असलेल्या नऊ वर्षीय बालकाचा मृतदेह आढळला. त्याच्या मृतदेहावर कापल्यागत जखमा असून डोळे व गुप्तांग बेपत्ता असल्याने खळबळ माजली. यामुळे हा प्रकार नरबळीचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस मात्र त्याचे कुत्र्याने वा अन्य जनावाराने लचके तोडल्याचा कांगावा करीत आहेत. ही घटना रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघड झाली. मृतकाचे नाव रूपेश हिरामण मुडे (९) रा. आर्वी नाका झोपडपट्टी असे आहे.विकास विद्यालयाच्या मागच्या आवारात सकाळी एका चिमुकल्याचा मृतदेह या भागात शौचास जाणाऱ्या नागरिकांच्या नजरेस पडला. मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत होता. त्यांनी याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. लागलीच ही बाब वाऱ्यासारखी पसरली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पाहता पाहता या चिमुकल्याची ओळख पटली. तो याच भागातील रहिवासी असून त्याचे रूपेश मुडे असल्याचे समोर आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या अंगावर कापल्याच्या जखमा आढळून आल्या. त्याचे दोन्ही पाय तळपायापासून पोटापर्यंत धारदार शस्त्राने कापले होते. शिवाय त्याचे डोळे व गुप्तांगही बेपत्ता होते. यामुळे परिसरात विविध चर्चेला पेव फुटले होते.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. चिमुकल्याच्या अंगावर असलेल्या जखमा कुत्र्याने त्याचे लचके तोडल्याने झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला; मात्र कुत्रा मानवाचे डोळे खात नाही, असे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे. यामुळे हा प्रकार नेमका काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ तपासाचा ससेमिरा टाळण्याकरिता पोलीस कुत्र्यानेच रूपेशच्या शरिराचे लचके तोडल्याचा दिखावा करीत असल्याचा आरोप रूपेशच्या आई-वडिलांसह परिसरातील नागरिकांनी केला आहे.रूपेशचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी शहर ठाण्यात भादंविच्या कलम ३६३ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सिआयडीमार्फत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)
त्या बेपत्ता बालकाचा नरबळी?
By admin | Updated: November 10, 2014 01:02 IST