लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘एमपीएससी’ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विद्यार्थी आक्रमक झाले व रस्त्यावर उतरले. या मुद्यावरून राजकारण तापले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर शरसंधान केले आहे. परीक्षा वेळेतच होणे आवश्यक आहे. मात्र सरकारमध्ये एकवाक्यता नाही. ‘एमपीएससी’च्या गोंधळातून सरकारमधील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. नागपुरात त्यांनी गुरुवारी सायंकाळी आपली भूमिका मांडली.
‘एमपीएससी’साठी विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत करतात. अशास्थितीत परीक्षा तोंडावर असताना ५-५ वेळा तिला रद्द केले जाते. माझ्या विभागातून पत्र कधी गेले हेच माहिती नसल्याचा अजब दावा सरकारचे मंत्री करतात. आपल्या विभागात काय सुरू आहे हे मंत्र्यांना माहीत नसणे, हे अजब आहे. जर असे असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुळात सरकारकडून या विषयाची हाताळणीच चुकीच्या पद्धतीने झाली आहे. परीक्षेमध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ असते व विद्यार्थी दूर दूर बसतात. महाविकास आघाडी शासनाच्या राज्यात आंदोलने सुरू आहेत, सत्कार सुरू आहेत. मात्र ‘कोरोना’चे कारण पुढे करून विद्यार्थ्यांना मनस्ताप देण्यात येत आहे. सरकारची भूमिकाच चुकीची आहे. परीक्षा निर्धारित वेळेतच घेतली पाहिजे, अशी मागणी करणारा ‘ई-मेल’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.