नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्य सरकारमध्ये सहयोगी असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना या मित्र पक्षांच्या गोटातून वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी शहरातील सर्व विधानसभा क्षेत्रांचा दौरा करून पक्ष संघटनेत प्राण फुंकण्याचा प्रयत्न चालविला.
यादरम्यान पटेल यांनी महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ आदी मुद्यांवरून भाजपावर हल्ला केला. पक्षातील वरिष्ठ नेते पक्ष संघटन सक्षम करण्यासाठी दर आठवड्यात कार्यकर्त्यांच्या घरी जातील, मनपा निवडणुकीत पक्षाच्या अधिकाधिक नगरसेवकांना निवडून आणण्याचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. कळमना रोडवरील महाकाळकर भवनात झालेल्या कार्यक्रमात शिवसेनाचे रविनिश पांडेय (चिंटू महाराज) यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे मोहन गुरुपंच, योगेश न्यायखोर, द्वारका साहू यांच्यासह डझनभर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा दुपट्टा गळ्यात घातला. दरम्यान, राष्ट्रवादीत प्रवेश करणारे शिवसेना पक्षात कधीच नव्हते, यामुळे पक्षावर कसलाही परिणाम पडणार नाही, असा दावा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गुड्डू रहांगडाले यांनी केला आहे.
मध्य नागपुरात झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे रमण ठवकर पुन्हा स्वगृही परतले. राजू पठाण, अशफाक खान, इमरान खान, देवाशिष खराबे आदींनीही प्रवेश घेतला. दक्षिण पश्चिम व पश्चिम नागपुरात झालेल्या कार्यक्रमातही इनकमिंगचा अनुभव आला. याप्रसंगी माजी मंत्री रमेश बंग, राजेंद्र जैन, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, गंगाप्रसाद ग्वालबन्सी, नगरसेवक आभा पांडेय, सलील देशमुख, वेदप्रकाश आर्य, प्रशांत पवार, दिलीप पनकुले, बजरंग परिहार, वर्षा शामकुळे, लक्ष्मी सावरकर, शैलेंद्र तिवारी, सुरेश गुडधे, महादेव फुके, रिजवान अन्सारी आदी उपस्थित होते.
...समस्या निवारणात सर्वतोपरी सहकार्य
नेहरू पुतळा, इतवारी येथे झालेल्या बैठकीत खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले, समस्यांच्या निराकरणासाठी पक्षाचे सर्वतोपरी सहकार्य राहील. नगरसेविका आभा बिज्जू पांडे यांचा पक्षात येण्यामुळे जनाधार वाढेल, सरकार आणि पक्ष जनतेच्या प्रश्नांवर त्यांच्या पाठीशी राहील. यावेळी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पटेल आणि अनिल देशमुख यांचा विविध सामाजिक आणि व्यापारी संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
...