काटाेल : काटाेल-कळमेश्वर- नागपूर मार्गावर २४ तास रहदारी असते. या मार्गाच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने त्यावर ठिकठिकाणी छाेटे-माेठे खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांमुळे या मार्गावर दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
हा मार्ग अमरावती व वर्धा तसेच मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्याला जाेडला आहे. त्यामुळे या मार्गावर जड व हलक्या वाहनांची २४ तास वर्दळ असते. मागील काही वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती करण्यात न आल्याने त्यावर खड्डे पडले आहेत. यातील काही खड्डे लांब व अरुंद आहेत. त्या खड्ड्यात दुचाकी गेल्यास ती स्लीप हाेऊन अपघात हाेत असल्याने दुचाकींसाठी हा मार्ग सध्या धाेकादायक झाला आहे. खड्ड्यांमुळे चारचाकी वाहनेही कमी वेगात चालवावी लागतात. मध्यंतरी लाेकमतमध्ये या राेडसंदर्भात वृत्त प्रकाशित करण्यात आले हाेते. त्या वृत्तांची दखल घेत बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्ड्यांची जुजबी दुरुस्ती केली. त्यानंतर ते खड्डे पूर्ववत तयार झाले. त्यामुळे या दुरुस्तीवर करण्यात आलेला काेट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला असून, त्यात भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे. या मार्गावरील वाढते अपघात व नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी या मार्गाची तातडीने दुुरुस्ती करावी, अशी मागणीही काटाेल, नरखेड, कळमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
...
डांबरीकरणाला उभ्या भेगा
या मार्गावरील काेंढाळी फाटा ते कुकडीपांजरा दरम्यान राेडवर उभ्या व लांब भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून मार्गक्रमण करीत असताना दुचाकीचालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटते आणि अपघात घडतात. या राेडवर इतर भागातही माेठे व रुंद खड्डे तयार झाले आहेत. या भेगा व खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. मात्र, या मार्गाच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागसाेबतच स्थानिक लाेकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत आहे, असा आराेप नागरिकांनी केला आहे.