नरखेड : लता मंगेशकर हाॅस्पिटल, नागपूरच्या वतीने महात्मा जोतिबा फुले जनआराेग्य याेजनेंतर्गत बेलाेना (ता. नरखेड) येथे राेगनिदान शिबिराचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. यात ३५० नागरिकांच्या आराेग्याची तपासणी करून गरजूंवर औषधाेपचार करण्यात आले.
या शिबिरात कान, नाक, घसा, अस्थिराेग, चर्मराेग, बालराेग, स्त्रीराेग, नेत्रराेग यासह अन्य रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील काही रुग्णांवर औषधाेपचार करण्यात आला, तर दीर्घकाळ आजारी राहणाऱ्या रुग्णांना नियमित औषधे घेण्याचे आवाहन करण्यात आले. डाॅ. अनिरुद्ध देवके, डाॅ. लिना बालपांडे यांच्या नेतृत्वातील डाॅक्टर व सहायकांच्या चमूने शिबिरात सेवा प्रदान केली. याप्रसंगी आयाेजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तरुणांनी रक्तदान केले. याप्रसंगी आजी आमदार डाॅ. आशिष देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सभापती उकेश चव्हाण, राहुल चव्हाण, रघुनाथसिंग राठोड, हरनामसिंग गौर, कमलाकर पराते, हरीश चव्हाण यांच्यासह नागरिक उपस्थित हाेते.