लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सावनेर शहरातील राम गणेश गडकरी महाविद्यालयाच्या सभागृहात विशेष सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या सभेत अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शिवाय, धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक लाख पत्रे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. बाबा टेकाडे यांनी दिली. यातील ५०० पत्रे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. बाबा टेकाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पंजाबराव कसरे, शरद नांदुरकर, प्रा. विजय टेकाडे, दौलत डहाके, राजू भक्ते, महादेव खरबडे, चंद्रकांत टेकाडे, ज्ञानेश्वर भक्ते, अनिल टेकाडे, गणेश डहाके, चंदू टेकाडे, कोमल भक्ते, हिरालाल आगरकर, शिवम भक्ते उपस्थित हाेते. अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी धनगर समाजाची आजची अवस्था, आरक्षणाची गरज, त्यासाठी केलेली व करावयाची आंदाेलने यासह अन्य बाबींवर चर्चा करण्यात आली. यात मुख्यमंत्र्यांना एक लाख पत्रे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील ५०० पत्रे पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती प्रा. बाबा टेकाडे यांनी दिली.
अतिथींनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर भाषणातून प्रकाश टाकला. राजू भक्ते व प्रफुल्ल वडे यांनी धनगर समाज भवनाच्या बांधकामासाठी पाच हजार चाैरस फुटाचा भूखंड दान दिल्याने त्यांचा गाैरव करण्यात आला. सभेला महाराष्ट्र धनगर समाज महासंघ व धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित हाेते. सभेदरम्यान काेराेना उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करण्यात आले हाेते.