लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या अर्थसंकल्पाचा ऐतिहासिक असा उल्लेख केला आहे. प्रथमच पायाभूत सुविधांसाठी इतकी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे रोजगारनिर्मितीदेखील वाढेल. शिवाय ‘स्टील’ आणि ‘सिमेंट’ उद्योगांमुळे इतर क्षेत्रालादेखील गतिमानता मिळेल. ‘एनआयपी’मुळे (नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन) रस्त्यांचा विकास होईल. ‘मॉनेटायझेशन’मुळे जास्त भांडवल उभे होईल. यामुळे महामार्गांच्या बांधकामाची गती वाढविण्याला मदत मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. मागील सहा वर्षांत पायाभूत सुविधांत ५० ते ६० टक्के सुधारणा झाली आहे व पुढील पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
१५ दिवसांत ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ घोषित करणार
‘स्क्रॅपिंग पॉलिसी’मुळे तर दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. २० वर्षे जुने ५१ लाख वाहने ‘स्क्रॅप’ होतील. देशभरात सर्व प्रकारची एकूण १ कोटीहून अधिक वाहने ‘स्क्रॅप’ होतील, त्यामुळे देशात ‘ऑटोमोबाईल’ क्षेत्रालादेखील ‘बूस्ट’ मिळेल व प्रदूषणदेखील कमी होईल. १५ दिवसांत ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ घोषित करण्यात येईल, असे गडकरी यांनी सांगितले.