बनवारीलाल पुरोहित : वास्तुविशारद ए.बी. डोंगरे यांना ‘विदर्भ गौरव पुरस्कार- २०१६’ प्रदान नागपूर : वास्तुविशारद ए.बी. डोंगरे यांनी बांधकाम व्यवसायात राहूनही आदर्शांशी तडजोड केली नाही. कंत्राटदाराशी वाटाघाटी केल्या नाहीत. कामात गुणवत्तेला प्राधान्य दिले. चुकीचे काम खपवून घेतले नाही, अशा शब्दात आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी वास्तुविशारद ए.बी. डोंगरे यांचा गौरव केला. कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे स्व. माणिकलाल गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा ‘विदर्भ गौरव पुरस्कार- २०१६’ ज्येष्ठ वास्तुविशारद ए.बी. डोंगरे यांना शनिवारी शंकरनगरातील साई सभागृहात आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला. आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह प्रदान करून डोंगरे यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी खासदार दत्ता मेघे होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार अजय संचेती उपस्थित होते. मंचावर डॉ. गिरीश गांधी, किशोर कन्हेरे, बंडोपंत उमरकर, परमजीत आहुजा, श्रीराम काळे, अॅड. निशांत गांधी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल पुरोहित पुढे म्हणाले, डोंगरे व माझा परिचय १९६९ पासूनचा आहे. अमळनेरहून परतताना एकदा आमच्या गाडीचा भीषण अपघात झाला व सुदैवाने आम्ही बचावलो, अशी आठवणही त्यांनी सांगितली. माणिकलालजी गांधी एक आदर्श सामाजिक कार्यकर्ते होते व त्यांनी कुटुंबावरही समाजसेवेचे संस्कार केले, असे सांगत त्यांचे पुत्र गिरीश गांधी हे हा वारसा चालवत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. खा. दत्ता मेघे यांनी डोंगरे यांच्या कामाचा गौरव करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचे शिस्तबद्ध काम सर्वांनी पाहिले आहे. भवन्समध्ये एखादी अॅडमिशन करायची असेल तेव्हा याचा अनेकांना अनुभव येतो. मी ही खूप विचार करूनच एखाद्या प्रवेशासाठी त्यांना विनंती करणारा फोन करतो, असे मेघे यांनी सांगताच सभागृहात हंशा पिकला. आपले पुरोेहित यांच्याशी अनेकदा मतभेद झाले पण मित्रत्वाचे संबंध नेहमी कायम राहिल्याचेही त्यांनी सांगितले. खा. अजय संचेती म्हणाले, राज्यपाल पुरोहित यांच्यासारख्या एका कर्मठ व्यक्तीच्या हातून डोंगरे यांच्यासारख्या दुसऱ्या कर्मठ व्यक्तीचा सन्मान होत आहे. हा त्यांच्या कामाचा गौरव आहे. प्रास्ताविकातून गिरीश गांधी म्हणाले, वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. चांगले काम करणाऱ्यांच्या या माध्यमातून गौरव केला जातो. ए.बी. डोंगरे हे जुन्या पिढीतील वास्तुविशारद असून उत्तम व्यक्ती आहेत. आर्किटेक्ट क्षेत्रात जोडतोडची संस्कृती फोफावत असताना डोंगरे यांनी कधीच तडजोड केली नाही, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सत्कारमूर्तींचा परिचय आर्किटेक्ट परमजीत आहुजा यांनी करून दिला. संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले. अॅड. निशांत गांधी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
आर्किटेक्ट असूनही कंत्राटदाराशी वाटाघाटी नाही
By admin | Updated: December 25, 2016 03:08 IST