कळमेश्वर : खापरखुटी, अळू, काटवेल, सुरण, तरोटा, टेना, बांबूचे वायदे, कुंदरभाजी, कुड्याची फुले आणि या सारख्या अनेक रानभाज्यांची नावे कधी ऐकली आहेत का? या रानभाज्या आरोग्यासाठी फारच पौष्टिक आहेत असे जाणकार सांगतात. या रानभाज्या विशेषतः शेतीच्या धुऱ्यावर, डोंगरदऱ्यांमध्ये हमखास आढळतात. अलीकडे बाजारात त्यांची मागणी खूप वाढली आहे. अनेकांना या वनसंपदेची माहितीच नाही. या उज्ज्वल वनठेव्याची माहिती व्हावी यासाठी आता कृषी विभाग सरसावला आहे.
शनिवारी प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय येथे सकाळी ९.३० वाजता रानभाजी महोत्सव आयोजित केला असून नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी उमाकांत हातागळे यांनी केले आहे. कळमेश्वर तालुका वनवैभवाने संपन्न आहे. येथील जंगलात मोठ्या प्रमाणावर दुर्मिळ वनस्पती आढळतात.