रुग्णांची संख्या २५८ वर: चार जणांचा मृत्यू नागपूर : शहरात डेंग्यू पॉझिटिव्हची संख्या २५८ वर गेली असून, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिकेच्या वतीने ३ लाख ७० हजार घरांची तपासणी केली असता ११ हजार घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. डेंग्यूच्या डासाने उपराजधानीत उच्छाद मांडला आहे. नोव्हेंबर महिना उजाडला तरी डेंग्यूचा प्रकोप कमी होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत लहान मुलांची बहुसंख्य इस्पितळे या रोगाच्या रुग्णांनी फुल्ल आहेत. असे असताना मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. हिवताप व हत्तीरोग विभागामध्ये एकटी महिला अधिकारी आपल्यापरीने काम करताना दिसून येत आहे. परंतु त्यांना त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांची मदत मिळत नसल्याची चर्चा आहे. याचा परिणाम या योजनेवर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.मागील वर्षी डेंग्यूचे ३०० वर रुग्ण आढळून आले होते तर एका मृत्यूची नोंद होती. यावर्षी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी असली तरी मृत्यूची संख्या एकवरून चार झाली आहे. (प्रतिनिधी)
डेंग्यूचा प्रकोप कायमच
By admin | Updated: November 3, 2014 00:42 IST