लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणकाळात प्रथमच विजेची मागणी २० हजार मेगावॅटवर पोहचली आहे. राज्यातील औद्याोगिक क्षेत्राची गाडी पुन्हा रुळावर येत असल्याचे हे संकेत मानले जात आहेत. मात्र या मागणीच्या पूर्ततेसाठी राज्याची शासकीय कंपनी असलेल्या महाजेनकोचे योगदान फक्त ६,३७७ मेगावॅट आहे. सध्यातरी केंद्राचे वीज निर्मिती केंद्र आणि खासगी उत्पादकांवर राज्यात वीज मिळत आहे.
सोमवारी राज्यातील विजेची मागणी २० हजार ४२७ मेगावॅटवर पोहचली होती. एप्रिलनंतर प्रथमच ही मागणी वाढली. कोरोना संक्रमणाच्या काळात ही मागणी १५ ते १७ हजाराच्या आसपास होती. यंदा उन्हाळ्यातही मागणी वाढली नव्हती. प्रत्यक्षात दरवर्षी उन्हाळ्यात मागणी २३ हजार मेगावॅटवर पोहचते. औद्योगिक उत्पादन कमी झाल्याने आणि व्यावसायिक क्षेत्राचे काम मंदावल्याने ही स्थिती होती, असे महाजेनकोचे म्हणणे आहे. या काळात अधिक उत्पादन करणारे संयंत्र बंद ठेवण्यात आले होते. अनलॉक सुरू झाल्यानंतरही परिस्थितीत फारशी सुधारणा नव्हती. मात्र दिवाळीनंतर वेग धरल्याचे दिसत आहे.
विजेची मागणी २० हजार मेगावॅटपेक्षा वाढल्याने बंद करण्यात आलेली संयंत्रे महावितरणकडून सुरू करण्यात आली आहेत. १० हजार ४२२ मेगावॅट क्षमतेच्या महाजेनकोमध्ये सध्या ६ हजार ३७७ मेगावॅट उत्पादन सुरू झाले आहे. मागणीतील तूट भरून काढण्यासाठी हायड्रो प्रकल्पांचेही उत्पादन वाढविण्यात आले आहे. यातून २ हजार ७१ मेगावॅट वीज मिळाली आहे. यात कोयना प्रकल्पाचा वाटा १ हजार ५९२ मेगावॅट होता.
राज्यात अखंड वीजपुरवठा करण्यामध्ये एनटीपीसी आणि खासगी कंपन्यांचे योगदान अधिक आहे. एनटीपीसीपासून महाराष्ट्राला ३ हजार ७८८ मेगावॅट तर खासगी कंपन्यांकडून ३ हजार ८८४ मेगावॅट वीज मिळाली. यात तिरोडा येथील अदानी प्रकल्पाचा वाटा मोठा राहिला.
...
९ युनिट अद्यापही बंद
विजेची मागणी वाढताच बंद पडलेले युनिट पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. मात्र महाजेनकोपुढे अद्यापही ९ युनिट पुन्हा सुरू करण्याचे आव्हान आहे.
भुसावळचे युनिट क्रमांक ३ उत्पादन खर्च अधिक असल्याने बंद आहे. खापरखेड्याचे युनिट क्रमांक ५ सुद्धा अशाच कारणाने बंद आहे. तर युनिट क्रमांक ३ च्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे. कोराडीतील युनिट क्रमांक ६ आणि ७ सुद्धा शून्य शेड्यूलमध्ये, तर १० व्या क्रमांकाचे युनिट दुरुस्तीमध्ये आहे. नाशिकमधील दोन युनिटही बंद आहेत.
...