लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी जरीपटका येथील मनपाच्या जागेवरील हॉकर्स झोनमधील ४० अस्थायी अतिक्रमणे हटविली.
जरीपटका बस स्टॉपमागील जिंजर मॉलच्या पूर्वेकडे मनपाने हॉकर्स झोन जाहीर केले आहे. या ठिकाणी विक्रेत्यांनी अस्थायी शेड उभारले होते. काहींनी ओटे बांधले होते. सुलभ शौचालयाच्या बाजूलाही अतिक्रमण करण्यात आले होते. यामुळे नागरिक त्रस्त होते. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात ३५ ते ४० विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले. सकाळी ११ च्या सुमारास अतिक्रमण कारवाईसाठी पथक पोहचताच विक्रेत्यांनी विरोध दर्शविला. मोठी गर्दी जमली होती. मनपानेच हॉकर्स झोन घोषित केले असल्याचे सांगितले. परंतु पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.
झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे, प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, निरीक्षक संजय कांबळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.