नागपूर : बुद्ध जयंतीचे औचित्य साधून श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने सेवाश्रम येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या दुर्मीळ छायाचित्रांची डिजिटल लिंक ‘चित्रगंध’चे लोकर्पण करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भंते डॉ.मेक्तानंद, श्रीगुरुदेव सेवा मंडळचे अध्यक्ष ॲड.अशोक यावले, सचिव विठ्ठलराव पुनसे व गुरुदेव प्रचार प्रमुख सियाराम चावकेदादा उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अधिष्ठानाला व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. बुद्ध जयंती व चित्रगंध याची माहिती देताना ॲड.यावले म्हणाले, तुकडोजी महाराजांनी २५००वी बुद्ध जयंती चिमूर येथे स्वच्छता अभियानाद्वारे साजरी केली होती. ही आठवण ठेवत महाराजांचा ‘डिजिटल चित्रगंध’ लिंकच्या रूपाने बुद्ध जयंतीचे औचित्य साधून लोकर्पण केला जात आहे. त्यामुळे ही छायाचित्रे आता जगभर उपलब्ध होतील. डॉ.मेक्तानंद म्हणाले, देशाला आज भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांच्या आचरणाची गरज आहे, अन्यथा अनेक संकटांना समोरे जावे लागेल. जगाला आज युद्ध नको, बुद्ध हवा आहे. मानवजातीला शांती, प्रेम, करुणा, याचा मार्ग त्यांनीच दाखविला आहे. कार्यक्रमाचे संचालक राजेश कुंभलकर यांनी तर आभार सियाराम चावके यांनी मानले. कार्यक्रमानंतर श्रमदान करून सुभाष रोड परिसर स्वच्छ करण्यात आला. विठ्ठलराव तळवेकर, मुरलीधर नरड, गणराज बसेशंकर, अशोक काकडे, राजेश तितरमारे, आनंद माथने, ललीत खवसे, राहुल उईके, जागेश्वर नंदवार आदी उपस्थित होते.