लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १३ जानेवारीला गळा घोटून ठार मारण्यात आलेल्या मृताची ओळख आज पटली. हरी ऊर्फ हरीश तुलसी अरकरा (वय २३) असे त्याचे नाव असून तो गोंदिया जिल्ह्यातील मुरमाडी (देवरी) येथील रहिवासी होता.
हरीशची बहीण आणि जावई पारडीत राहतात. तो तीन वर्षांपूर्वी नागपुरात रोजगारानिमित्त आला होता. सध्या एका ट्रकवर क्लिनर म्हणून काम करायचा. त्याला दारूचेही व्यसन होते. अधूनमधून बहिणीच्या घरी जात होता. रविवारी, १० जानेवारीला तो बहिणीकडे गेला होता. त्यानंतर १३ जानेवारीला त्याचा मृतदेह बेवारस अवस्थेत पोलिसांना आढळला होता. पोलीस त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न करीत असतानाच १६ जानेवारीला डॉक्टरांनी हरीशचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचा अहवाल दिला. त्यामुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली. पारडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून शोधमोहीम तीव्र केली. आज सकाळी पोलिसांना मृतकाची बहीण पारडीतच राहत असल्याचे कळाले. त्याचे नाव, गाव पत्ताही मिळाला. त्यामुळे आता पोलिसांनी त्याच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी धावपळ चालविली आहे.
---
साथीदारांनीच केला घात?
मृत हरीशला दारूचे व्यसन असल्याने तो कुणासोबतही दारू प्यायचा. १२ जानेवारीच्या रात्री अशाच प्रकारे त्याचा दारूच्या नशेत आरोपीसोबत वाद झाला असावा आणि त्याने त्याला दुपट्ट्याने गळा आवळून त्याला ठार मारले असावे, असा संशय आहे. त्यामुळे हरीश नेहमी कुणासोबत राहायचा, दारू प्यायचा, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
----