नागपूर : कर्तव्य आटोपून दुचाकीने घराकडे निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर रस्त्यातच काळाने झडप घातली. आकाश राजकुमार मिश्रा (वय २७) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते पोलीस लाईन टाकळी मागे पेन्शननगरात राहत होते. मिश्रा सदर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शनिवारी दुपारी १२ ते १ च्या सुमारास कर्तव्य आटोपून ते आपल्या घराकडे दुचाकीने निघाले. सीआयडी ऑफिस समोर त्यांना अचानक चक्कर आल्याने ते दुचाकीवरून खाली पडले. आजूबाजूच्यांनी मदत करून त्यांना लगेच मेयो हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुनील भैयालाल शुक्ला यांनी दिलेल्या सूचनेवरून गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
पोलीस कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याची २४ तासातील ही दुसरी घटना आहे. जरीपटक्यातील पोलीस कर्मचारी केविन मायकल नॉरबट (वय २७) यांचा शुक्रवारी रात्री ७ च्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.
---
अपघातातील जखमीचा मृत्यू
नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ मेच्या दुपारी अपघातात जखमी झालेले प्रकाश संजयराव ढवळे (वय ५३) यांचा मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीवरून गणेशपेठ पोलिसांनी शुक्रवारी अपघाताची नोंद केली. ढवळे यांना धडक मारून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या आरोपी वाहनचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
---
एमआयडीसीतील तरुणाची आत्महत्या
नागपूर : एमआयडीसीतील एकात्मतानगरात राहणारे मोरेश्वर गुजरात बावनकर (वय ३२) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. लता संजय बागडे (वय ३८) यांनी दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---