नागपूर : वेल्डिंगचे काम करत असलेल्या मजुराचा पडल्याने मृत्यू झाला. ही घटना पारडी येथील आहे. हल्दीराम फॅक्टरीजवळ अविनाश रामूजी लांजेवार (५०) वेल्डिंगचे काम करत होते. लांजेवार कंबरेला बेल्ट बांधून उंचावर वेल्डिंग करत होते. कंबरेचा पट्टा तुटल्याने ते खाली पडले. डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर मेयो इस्पितळात उपचार सुरू होते. मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. पारडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचे प्रकरण नोंदवले आहे.
-------------
वैमनस्यातून शेजाऱ्यावर हल्ला
नागपूर : आपसी वैमनस्यातून एका कुटुंबाने शेजारच्या कुटुंबावर हल्ला चढवला. ही घटना मंगळवारी रात्री मानकापूर गोधनी येथील आहे. पोलीसांनी पाच आरोपींच्या विरोधात प्रकरणाची नोंद केली आहे. आरोपी मोरेश बोधन उपरीकर (४८), संजू मोरेश उपरीकर (२१), राजू मोरेश उपरीकर (२४), नवीन मोरेश उपरीकर (२०) व मोरेश उपरीकरची पत्नी (४५) आहेत. उपरीकर कुटुंबीयांच्या शेजारी राजू कोलते राहतात. दोघांमध्येही बऱ्याच काळापासून वैमनस्य आहे. मंगळवारी रात्री आरोपींनी राफ्टर व सळाखींनी हल्ला चढवून राजूला जखमी केले. मानकापूर पोलीसंनी दंगा व हल्ल्याचे प्रकरण नोंदवले आहे.
--------------
घरफोडीच्या प्रयत्नात असलेले आरोपी अटकेत
नागपूर : तहसील पोलीसांनी घरफोटीसाठी एकत्रित आलेल्या चार आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी शेख सोहेल ऊर्फ भांजा शेख मुख्तार (१९, रा. यासिन प्लाट, ताजाबाद,) समक्ष सोहेल प्रेमनाथ मौंदेकर (१९, रा. गोळीबार चौक), वैभव नरुनदास वाघेला (१९, रा. मोमीनपुरा), सोनू ओमप्रकाश साखरे (३२, रा. ज्योतीनगर, खदान) हे आहेत. त्यांचा साथीदार संजोग होले फरार आहे. पोलीसांनी त्रिपिठक बौद्ध विहाराजवळ आरोपींना संशयास्पद स्थितीत पकडले. चौकशी केली असता त्यांच्याजवळ शस्त्र आढळले. आरोपी कुख्यात गुन्हेगार आहेत. त्यांना अटक करून घरफोडीची योजना आखण्याचे प्रकरण नोंदविण्यात आले आहे.
..............