नागपूर : अंबाझरी तलावातील माशांच्या मृत्यूची परिस्थिती अधिकच भीषण होत चालली आहे. गेल्या चार दिवसांपासून माशांच्या मृत्यूचे सत्र सुरू असून मृत माशांमुळे आता दुर्गंधी येऊ लागली आहे. मात्र माशांचा मृत्यू कशाने होत आहे, हे जाणून घेण्याची साधी तसदीही महापालिकेने घेतल्याचे दिसत नाही. माशांचा मृत्यू हा नागनदीद्वारे एमआयडीसीतील उद्योगांच्या रासायनिक प्रदूषणामुळे होत असल्याचा दावा पर्यावरणतज्ज्ञांनी केला आहे.
गेल्या चार दिवसांपासून अंबाझरी तलावात माशांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. तलावाच्या काठावर आणि इतरत्र मृत माशांचा खच पडलेला दिसून येतो. मृत्यूचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे आणि आता दुर्गंधीही सुटायला लागली आहे. हा मृत्यू उष्णतेमुळे होत असल्याचे बोलले जात असले तरी त्यात फारसे तथ्य दिसून येत नाही. कारण तापमान दोनच दिवसापासून वाढत आहे.
पर्यावरण अभ्यासक ग्रीन व्हिजिलचे कौस्तुभ चॅटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी या काळात नीरीने तपासणी केली असता तलावाच्या पाण्यात रासायनिक प्रदूषणाचे प्रमाण आढळून आले होते. यावेळीही ती शक्यता नाकारता येत नाही. इंडस्ट्रीचे वेस्ट वॉटर आणि शेतीमधील पाणी अंबाझरी तलावात जाऊन मिसळते. इंडस्ट्रीमधून निघणाऱ्या पाण्यामध्ये ॲसिड, अल्युमिनियम, डिटेरजंट, फिनाल, अमोनिया, तसेच लेड, कॉपर, झिंक आदी जड धातू सारखे घातक घटक असतात जे मासेच नाही तर तलावातील जैव विविधतेला प्रचंड नुकसानकारक असतात. शिवाय शेतातून निघणारे पेस्टिसाईड, इनसेक्टिसाईडसुद्धा अतिशय घटक ठरतात. एमआयडीसी व नागनदीला लागून असलेल्या शेतीमधून हे रासायनिक घटक अंबाझरीच्या पाण्यात मिसळत असतात. त्यामुळे वर्षभरापूर्वीही माशांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. एकीकडे वाढते तापमान आणि दुसरीकडे इंडस्ट्रीमधले रासायनिक प्रदूषण यामुळे तलावातील मासे मरून पडत आहेत. चॅटर्जी यांच्या मते, माशांच्या प्रत्येक प्रजातीची प्रतिकारशक्ती वेगळी असते. ज्या प्रजाती हे घातक प्रदूषण सहन करू शकत नाही, त्यांचे मृत्यू होत आहेत, असे दिसते. मासेच मरतात असे नाही तर तलावाची पूर्ण जैवविविधता धोक्यात आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी उत्तर देणे टाळले. मासे मरत असताना साधी तपासणी करण्याची तसदीही मनपाने घेतली नाही. निरीकडूनही याबाबत रिस्पॉन्स मिळू शकला नाही.
- तलावात उद्योगाचे पाणी सोडणे बेकायदेशीर
वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट १९७४ अंतर्गत उद्योगातून निघणारे वेस्ट वॉटरची ट्रीटमेंट करणे बंधनकारक आहे. ट्रीट केलेले पाणीही तलावात सोडण्याची परवानगी नाही. असे असताना एमआयडीसीतील उद्योगांचे पाणी नागनदीद्वारे अंबाझरी तलावात येत असेल तर हा गंभीर प्रकार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेनही यावर कारवाई करणे गरजेचे आहे, असे मत चॅटर्जी यांनी व्यक्त केले.