नागपूर : महाराष्ट्र प्रशासकीय लवादाने घरभाडे भत्त्यासंदर्भातील अर्ज मंजूर करून एका शहीद पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीला दिलासा दिला आहे.सविता धोपाडे असे वीरपत्नीचे नाव आहे. त्यांचे पती किरणकुमार धोपाडे हे ३० मे २००५ रोजी नक्षलींनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात शहीद झाले होते. लवादाचे न्यायिक सदस्य एम. एन. गिलानी यांनी राज्य शासनाच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, वरिष्ठ कोषागार अधिकारी, महालेखाकार (निवृत्तीवेतन) व गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ६ जुलै २००५ रोजीच्या ‘जीआर’नुसार येत्या ३ महिन्यांत घरभाडे भत्ता प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, धोपाडे यांना विनाकारण न्यायालयात धाव घ्यायला लावल्यामुळे त्यांना १० हजार रुपये खर्च द्यावा, असे गोंदिया पोलीस अधीक्षकांना आदेश देण्यात आले आहेत. शहीद पोलीस अधिकाऱ्यांच्या विधवांना घरभाडे देण्याचा प्रसंग पहिल्यांदाच आलेला नाही. ६ जुलै २००५ पासून अनेक विधवा व संबंधित वारसदारांचे दावे निकाली काढण्यात आले आहेत. याचप्रकारे धोपाडे यांचाही दावा निकाली काढायला हवा. संबंधित विभागाला तांत्रिक अडचणी सोडविता येत नसल्यास त्याचा त्रास दावेदाराला सहन करायला लावू शकत नाही, असे लवादाने निर्णयात नमूद केले आहे. अर्जदारातर्फे अॅड. एस. पी. पळशीकर यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
शहीद पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीला दिलासा
By admin | Updated: March 23, 2015 02:24 IST