नागपूर : राज्य सरकारने महापालिकेची निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याची घोषणा करताच भाजप पुन्हा एकदा सत्तेचा झेंडा रोवण्यासाठी सज्ज झाली आहे. शनिवारी निवडणुकीसाठी विधानसभानिहाय प्रभारींची घोषणा करण्यात आली. येत्या दोन दिवसात विविध आघाड्यांचे पालकही नियुक्त केले जाणार आहेत.
महापालिका निवडणुकीबाबत शनिवारी शहराध्यक्ष प्रवीण दटके, संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात बैठक झाली. यावेळी संघटन मंत्री सुनील मित्रा यांनी प्रभारींची घोषणा केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाचे प्रभारी म्हणून शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पूर्व नागपूरची जबाबदारी माजी आमदार अनिल सोले यांच्याकडे तर मध्य नागपूरची जबाबदारी आमदार गिरीश व्यास यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. माजी महापौर संदीप जोशी हे पश्चिम नागपूरचे प्रभारी असतील तर उपाध्यक्ष भोजराज डुंबे यांना दक्षिण नागपूर व प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांना उत्तर नागपूर मतदारसंघाचे प्रभारी नेमण्यात आले आहे.
याशिवाय समित्याही स्थापन करण्यात आल्या. संघटनेची जबाबदारी सुनील मित्रा यांच्यावर सोपविण्यात आली. मतदार नोंदणी समितीचे प्रमुख म्हणून गिरीष देशमुख, प्रचार प्रसार समिती प्रमुख म्हणून संदीप जोशी यांना नेमण्यात आले.
राज्य सरकारविरोधात आंदोलनाची रणनिती
- बैठकीत राज्य सरकारविरोधात विविध मुद्द्यांवर आंदोलन करण्याची रणनिती आखण्यात आली. शहराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून निधी देण्यात होत असलेली टाळाटाळ, राज्य सरकारकडे रखडलेले विकासकामांचे प्रस्ताव आदी मुद्दे जनतेसमोर प्रकर्षाने मांडण्यावरही चर्चा झाली.