लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे अगोदरच अडचणीत आलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये यंदा प्रवेशाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार प्रवेशासाठी अर्ज भरण्याची १५ डिसेंबर ही अखेरची मुदत होती. मात्र अद्यापही हवे त्या प्रमाणात अर्ज न आल्यामुळे आता २२ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुदतवाढ देण्यात आली असून, यामुळे महाविद्यालयांना दिलासा मिळाला आहे.
‘कोरोना’मुळे ‘एमएचटीसीईटी’ला उशीर झाला. मात्र निकाल लागल्यावरदेखील यासंदर्भात काहीच हालचाल होत नव्हती. इतर राज्यांमधील प्रवेशप्रक्रिया सुरूदेखील झाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले होते. अखेर राज्य सीईटी सेलतर्फे वेळापत्रक घोषित करण्यात आले व १५ डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. मात्र अद्यापही हव्या त्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे अर्ज आलेले नाही. यंदा जास्त जागा रिक्त राहिल्या तर अभियांत्रिकी महाविद्यालयांचे अक्षरश: कंबरडे मोडेल. त्यामुळेच अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. अभियांत्रिकीसोबतच ‘बीफार्म’, एमबीए, एमसीए यासारख्या अभ्यासक्रमांच्या नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
वर्ग १५ जानेवारीनंतरच सुरू होणार
नियोजित वेळापत्रकानुसार शैक्षणिक वर्ग ४ जानेवारीपासून सुरू होणार होते. मात्र आता अर्ज भरण्यासच मुदतवाढ दिल्याने इतर सर्व प्रक्रियादेखील पुढे ढकलल्या जाईल. पुढील वेळात्रपक दोन ते तीन दिवसात जाहीर होणार आहे. मात्र मुदतवाढीमुळे प्रत्यक्षात वर्ग हे १५ जानेवारीनंतरच सुरू होऊ शकणार आहेत.
‘डीटीई’ करणार विद्यार्थ्यांमध्ये जागृती
दरम्यान, अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सहकार्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयानेदेखील पुढाकार घेतला आहे. सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सोबत मिळून ‘डीटीई’तर्फे विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमांबाबत जागृती करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. त्यांना दूर करण्यासाठी मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नवीन वेळापत्रक
अभ्यासक्रम-अर्ज भरण्याची अखेरची मुदत
बी.ई. - २२ डिसेंबर
बी.फार्म. - २१ डिसेंबर
बी.आर्क. - २० डिसेंबर
एमबीए - २० डिसेंबर
एमसीए - २३ डिसेंबर