एसीबीने दोन हजाराची लाच घेताना पकडले नागपूर : तहसील कार्यालयात दोन हजार रुपयांची लाच घेत असताना एका दलालाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या चमूने (एसीबी) रंगे हात पकडले. तहसील कार्यालयात बाहेरची व्यक्ती दलाली करीत असल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे तहसील कार्यालयात खळबळ माजली आहे. प्रफुल्ल उदाराम गाणार (४०) रा. ज्ञानेश्वरनगर असे आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार तहसीलदार कार्यालयातील चपराशी जांभुळकर फरार झाला. तक्रारकर्ता शेतकऱ्याने २०१२ मध्ये दोन प्लॉट खरेदी केले होते. दोन्ही प्लॉट अकृषी मंजुरीसाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तहसील कार्यालयात आला. तिथे त्याची जपराशी जांभुळकरसोबत भेट झाली. त्याने कामासाठी लाच मागितली. त्यामुळे शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार बुधवारी जांभुळकरला पकडण्याची योजना आखण्यात आली. योजनेनुसार तक्रारकर्त्या शेतकऱ्याने जांभुळकरची भेट घेतली. त्याने आरोपी गाणारकडे पाठविले. गाणारने १२०० रुपये शुल्कासह २ हजार रुपये लाच मागितली. दोन हजार रुपये अगोदर देण्यास सांगितले. पैसे हाती घेताच त्याला पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर बहादुरे, निरीक्षक विनोद वाकडे, हवालदार संजय ठाकूर आणि हलमारे यांनी केली. (प्रतिनिधी)अधिकारी पळून गेलेएसीबीच्या कारवाईची माहिती होताच तहसीलदार कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी पळून गेले. आरोपी गाणार हा बाहेरचा व्यक्ती असूनही त्याला बसण्यासाठी टेबल-खुर्ची उपलब्ध होती. कोणत्या आधारावर त्याला इथे जागा देण्यात आली, हा तपासाचा विषय आहे. सूत्रांनुसार गाणार अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाच देऊन लोकांची कामे करीत होता. एसीबी अधिकाऱ्यांच्या भूमिकेचाही तपास लावीत आहे.
तहसील कार्यालयातील दलालाला चाप
By admin | Updated: December 4, 2014 00:43 IST