नागपूर : एका बंगल्याच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी जेवण तयार करीत असताना सिलिंडरचा स्फोट झाला. एकापाठोपाठ चार सिलिंडरच्या या स्फोटात परिसरातील गरीब मजुरांचे झोपडे जळून खाक झाले. काही घरांच्या खिडक्यांचे काच फुटले. दुसरीकडे स्वयंपाक करणारे आचारी व पाहुणे मात्र थोडक्यात बचावले. ही घटना बुधवारी दुपारी जयताळा येथील अष्टविनायकनगर येथे घडली. या घटनेमुळे जयताळा परिसर हादरले आहे. प्रशांत येरखेडे यांनी जयताळा येथील अष्टविनायकनगरात प्लॉट नंबर ४४ व ४५ यावर घर बांधले. बुधवारी गृहप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ४६ क्रमांकाचा प्लॉट उघडा असल्याने त्यावर मंडप उभारण्यात आला होता. बाजूलाच काही मजुरांच्या झोपड्या आहेत. सायंकाळी कार्यक्रम असल्याने जेवणाची तयारी दुपारपासूनच करण्यात येत होती. दुपारी ३ वाजताच्या सुमारास मंडपातच जेवण तयार केले जात होते. आचारी आणि महिला स्वयंपाकाच्या कामात गुंतल्या होत्या. दरम्यान एका सिलिंडरमध्ये अचानक आग लागली. महिलेच्या लक्षात येताच तिने आचाऱ्याला सांगितले. आग विझविण्याचा प्रयत्न करीत असतानाच सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट होताच खळबळ उडाली. पळापळ सुरू झाली. स्वयंपाकासाठी आणलेले साहित्य व तेलामुळे आग पसरली. स्वयंपाकाच्या ठिकाणी १४ व्यावसायिक सिलिंडर ठेवले होते. त्यातील आणखी तीन सिलिंडरचा एकेक करीत स्फोट झाला. आगीने रुद्र रूप धारण केले. यामुळे जवळच असलेल्या तीन झोपड्या जळून खाक झाल्या. झोपड्यांमधील मजुरांचे सर्व साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन विभागाला सूचना देण्यात आली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या लगेच घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. मोकळ्या मैदानात जेवण बनविण्यात येत असल्याने जीवहानी टळली. गरीब मजुरांवर मोठे संकटगृहप्रवेशाच्या पूर्वीच घडलेल्या या घटनेमुळे येरखेडे कुटुंबीयांचा आनंद हिरावलाच. परंतु या आगीत गरीब मजुरांचे झोपडे जळून खाक झाले. त्यात त्यांचे संपूर्ण वस्तू जळाल्या. अन्नधान्यासह, कपडे, पलंग, दस्तऐवज सर्वकाही जळाले. एकही वस्तू शिल्लक राहिली नाही. त्यामुळे या गरीब मजुरांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
सिलिंडर स्फोटाने हादरले जयताळा
By admin | Updated: November 17, 2016 02:44 IST