लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारपासून कडक लॉडाऊन जाहीर केल्यामुळे शुक्रवारी नागपुरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले होते. तसेच चित्र शनिवारीही दिसले. पुढील सात दिवस कडोकोट बंद राहणार असल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. उद्याची गैरसोय होऊ नये म्हणून आजच वस्तुंची तजवीज करण्यासाठी प्रत्येकाची धावपळ सुरू होती. त्यामुळे दुकाने, बाजारपेठा बंद असल्या तरी रस्त्यांवरची वर्दळ मात्र कुठेही कमी झालेली दिसून आली नाही.
रविवारीही बंद राहणार असून, सोमवारपासून २१ तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू होईल. यासाठी प्रशासनासह पोलीस विभागानेही कंबर कसली आहे. शनिवारी बंददरम्यान नागरिक कोरोनाच्या संदर्भात गंभीर दिसून आली नाही. रस्त्यांवर सर्वत्र वर्दळ होती. प्रशासनाच्या आदेशानुसार बाजारपेठा, दुकाने पूर्णपणे बंद असली, तरी नियमांचे उल्लंघनही मोठ्या प्रमाणावर होत होते.
मास्क व सुरक्षित अंतराचेही पालन नाही
- बंददरम्यान नागरिक बिनधास्त फिरत होतेच, परंतु अनेक जण मास्क न घालताच फिरत होते. सुरक्षित अंतराचे पालनही होत नसल्याचे अनेक ठिकाणी आढळून आले.