भिवापूर : मंगळवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात होत्याचे नव्हते केले आहे. नदीनाल्यांना पूर आला आणि शेतासह उभी पिके पाण्यात बुडाली. दरम्यान, पूरपरिस्थिती ओसरताच मंडळ अधिकारी, तलाठी अशी महसूल विभागाची टीम नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेताच्या बांध्यावर पोहचली आहे.
मंगळवारी भिवापूर तालुक्यात १२४.२५ मिमी पाऊस झाला. एकट्या कारगाव मंडळात १६९ मिमी, मालेवाडा मंडळात १४१ म.मी, नांद मंडळात १२० तर भिवापूर मंडळात ६७ मिमी पावसाची नोंद झाली. चार तासाचा हा पाऊस आभाळ फाटल्यागत होता. त्यामुळे कापणीला आलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातात येण्याची शक्यता आता धूसर आहे. काही शेतात कापणी झालेल्या सोयाबीनचे ढीग तलावसदृश परिस्थितीत उभे आहेत. कापूस, मिरचीसह इतर पिकांचे हाल याहून वेगळे नाही. शेतातील उभी कपाशी आडवी झाली आहे. सोयाबीन काळवंडला असून, त्याचा सडवा होण्याची शक्यता आहे. यदाकदाचित थोड्या फार प्रमाणात सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आले तरी त्यात गुणवत्ता नसणार आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पूरपरिस्थिती ओसरण्यास सुरुवात झाली. मात्र त्यानंतरही बुधवारी सकाळी अनेक शेतात पाणी साचले असल्याचे दृश्य शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू ढाळणारे होते. तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या आदेशानुसार बुधवारी सकाळपासूनच महसूल विभागाचे अधिकारी आपापल्या तलाठी साजामध्ये नुकसानीचे सर्व्हे आणि पंचनामे करण्याच्या कामाला लागले. तालुक्यात एक हजार हेक्टरवर शेतिक्षेत्रात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नांद, महालगाव, चिखलापार, कारगाव, जवळी, नक्षी, मेढा, वडध, चिखली, मांगली, रोहणा, मालेवाडा, बेसूर या भागात नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. आ. राजू पारवे यांनी अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, सभापती नेमावली माटे, सभापती ममता शेंडे, सभापती विठ्ठल राऊत, जि.प. सदस्य शंकर डडमल, राहुल मसराम, विजय वराडे, तुळशीदास चुटे आदी उपस्थित होते.
तात्काळ नुकसान भरपाई द्या------------
माजी आ. सुधीर पारवे यांनी नुकसानग्रस्त गावांचा दौरा करीत पाण्याखाली बुडालेल्या शेतातील पिकांची पाहणी केली. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून कुठलेही निकष न ठेवता शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत फोनवरून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. यावेळी भास्कर येंगळे, केशव ब्रम्हे, प्रमोद बावनगडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
---
३० घरांची पडझड
मुसळधार पावसामुळे घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. भिवापूर शहरात ५, धामणगाव (वि.म.) ४, बेल्लरपार ५, धापर्ला (डोये) २, कारगाव २, भगवानपूर १२ अशा एकूण ३० घरांची पडझड झाली आहे. गोंडबोरी-सेलोटी मार्गावरील पुलाचा वरचा भागही वाहून गेला आहे.
--