- आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येत्या ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. मागील वर्षी झालेल्या कामांचे १५० कोटी रूपये थकित असताना सरकारकडून फक्त २० कोटी रूपये वाटप झाल्यामुळे नाराज ठेकेदारांनी हा “मोठा विनोद” असल्याचे सांगत शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. परिणामी, सार्वजनिक बांधकाम विभागासमोर १ डिसेंबरची डेडलाइन गाठण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मागील हिवाळी अधिवेशन कामांचे १५० कोटी रूपयांची थकबाकी आहे. आगामी अधिवेशनासाठी सुद्धा ९३.८४ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. महिन्याच्या सुरुवातीला ठेकेदारांनी अनेक दिवस कामबंद ठेवले होते. त्यानंतर पीडब्ल्युडी आणि राज्य सरकारने आश्वासन देत सांगितले की थकबाकी लवकरच मिळेल. मात्र गुरुवारी पीडबल्युडीला या खात्यातून फक्त २० कोटी रूपये मिळाले.
या घडामोडीमुळे ठेकेदारांच्या आपत्कालीन बैठकीत कामबंदचा निर्णय घेण्यात आला. नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध सरोदे यांनी रविभवन, विधायक निवास, हैदराबाद हाऊस, देवगिरी येथे सुरू असलेली कामे तत्काळ बंद करण्याचे आवाहन केले.
त्यांनी सांगितले की, मुख्य अभियंता संभाजी माने, अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे आणि कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत राऊळकर यांच्या आश्वासनावर ठेकेदारांनी पूर्वी आंदोलन मागे घेतले होते, पण प्रत्यक्षात फक्त आश्वासनच मिळाले. आता मिळालेले २० कोटी रूपये म्हणजे उंटाच्या तोंडातील जीरे. यामधून वीज, पाणी आदींचे बिलही भागवावे लागणार आहेत.
बैठकीत संजय मैंद, संजय गिल्लोरकर, शिरीष गोडे, महेंद्र कांबळे, राकेश असाठी, अनिकेत डांगरे, रुपेश रणदिवे, राजीव भांगे, प्रशांत जाणे, संभाजी जाधव, प्रशांत मड्डीवर, दिलीप टिपले, मुकुल साबळे, दिनेश मंत्री, अतुल कलोती, बिपिन बन्सोड, प्रशांत पांडे, पी. एन. नायडू, अनिल शंभरकर, नरेश खुमकर आदी उपस्थित होते.
शुक्रवारी मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन देऊन आंदोलनाची माहिती देण्यात येणार आहे.पीडब्ल्यूडीचे अधिकारी ठेकेदारांच्या या भूमिकेमुळे चिंताग्रस्त आहेत. ठेकेदारांनी आंदोलन केल्यास कामे वेळेत पूर्ण होणे कठीण होईल, असे त्यांनी म्हटले आहे. तथापि, काही ठेकेदार बॅकडोअरने (गुपचूप) काम सुरू ठेवतील, असेही काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.- ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे कठीण आव्हान- हैदराबाद हाऊसच्या बॅरेकमध्ये छत पूर्णपणे उघडे आहे; १ डिसेंबरपूर्वी सर्व काम पूर्ण करायचे आहे.- रविभवनमधील चार कॉटेजच्या छताचे काम सुरू असून नवीन छत बांधले जात आहे.- विधान भवनातील मंत्र्यांच्या केबिनचे काम अद्याप अपूर्ण आहे.- वनविभाग चौक ते बोर्ड ऑफिस चौक या दरम्यानचे सिमेंट रस्त्याचे काम ५० टक्के अपूर्ण.
Web Summary : Contractors threaten work stoppage before the winter session due to ₹150 crore unpaid dues, with only ₹20 crore released. Nagpur Contractors Association urges halting Ravi Bhavan, Hyderabad House works. Deadline looms for PWD to complete pending tasks.
Web Summary : शीतकालीन सत्र से पहले ठेकेदारों ने ₹150 करोड़ के बकाया भुगतान न होने पर काम रोकने की धमकी दी, केवल ₹20 करोड़ जारी किए गए। नागपुर ठेकेदार संघ ने रवि भवन, हैदराबाद हाउस के कार्यों को रोकने का आग्रह किया। पीडब्ल्यूडी के लिए लंबित कार्यों को पूरा करने की समय सीमा।