सहा तासात चार ठिकाणी लूटमार : नागरिकांमध्ये दहशत नागपूर : गुन्हेगारांनी सहा तासात शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी लुटपाट केली. गुन्हेगारांनी घातलेल्या या हैदोसामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. पहिली घटना सदर येथे घडली. राजापेठ अमरावती येथील प्रणव अनिल भांबोरे हे गुरुवारी दुपारी २.३० वाजता पत्नीसोबत सदर येथे आले होते. त्यांनी सदर येथील मेश्राम चौकात कार उभी केली. पत्नीसोबत ते जवळच्याच रेस्टॉरंटमध्ये गेले. कारला लॉक न केल्याने आरोपींनी कारमध्ये ठेवलेली पर्स चोरून नेली. पर्समध्ये ६ हजार रुपये आणि मोबाईलसह ५१ हजार रुपयाचे सामान होते. दुसरी घटना सायंकाळी ६.४५ वाजता एम्प्रेस मॉलजवळ घडली. बजेरिया येथील ४० वर्षीय राजकुमार मिश्रा दुचकीने जात होते. एम्प्रेस मॉलजवळ दोघा व्यक्तींनी पंडितजी म्हणून आवाज देत मिश्रा यांना थांबवले. मिश्रा आवाज ऐकून थांबले. यानंतर चाकूच्या धाक दाखवून रोख रकमेसह १४ हजार रुपये लुटून नेले. तिसरी घटना मेयो रुग्णालय चौकाजवळ घडली. इतवारी येथील महिला डॉक्टर सायंकाळी ६ वाजता आपल्या कारने रुग्णालयातून घराकडे जात होत्या. मेयो रुग्णालय चौकातून दोसर भवन चौकादरम्यान एका मेडिकल स्टोरमध्ये औषध घेण्यासाठी त्या थांबल्या. कारमध्ये बसलेल्या ड्रायव्हरला खाली नोटा पडल्याचे सांगून कारच्या मागच्या सीटवर ठेवलेली बॅग चेरट्यांनी लंपास केली. बॅगमध्ये ६ लाख रुपये आणि ५० हजाराचे दागिने होते. चौथी घटना दोसर भवन चौकास सिंह पेट्रोल पंपावर घडली. रात्री ९.३० वाजता पेट्रोल पंपाचे कर्मचारी इंद्रकुमार दसेरिया ग्राहकांना पेट्रोल वितरित करीत होता. त्यावेळी एक युवक इंद्रकुमारजवळ आला. चाकूचा धाक दाखवून त्याच्या हातातून सहा हजार रुपये हिसकावून नेले.(प्रतिनिधी) पोलिसांच्या सक्रियतेवर प्रश्नचिन्ह सेंट्रल एव्हेन्यू व्यापारी परिसर आहे. या मार्गावर ५० पेक्षा अधिक बँक आणि एटीएम आहेत. मार्गाच्या दोन्ही बाजूंनी व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. यामुळे या ठिकाणी पोलिसांची नेहमी गस्त असते. यानंतरही या ठिकाणी दोन मोठ्या घटना घडल्याने पोलिसांच्या सक्रियतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरात गुन्हेगारांचा हैदोस
By admin | Updated: January 16, 2017 01:59 IST