कारखानदाराला धमकी : कुख्यात राधे टोळीवर गुन्हा दाखल नागपूर : बंगाली कारखानदारांना धाक दाखवून दरमहा खंडणी वसूल करण्याच्या आरोपाखाली पाचपावली पोलिसांनी चार गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. राधे ऊर्फ राधेश्याम, समीर तुळशीराम भिसीकर (वय २४) शुभम ऊर्फ झिंग्या आणि निशांत (सर्व रा. तांडापेठ) अशी या खंडणीखोर टोळीतील गुंडांची नावे आहेत. तांडापेठमध्ये पश्चिम बंगाल आणि अन्य काही ठिकाणाहून सलवार सूट तयार करणारी मंडळी आली आहे. त्यांनी छोटे छोटे कारखाने या भागात उघडले. येथे मोठ्या प्रमाणात रेडिमेड कपडे तयार केले जातात. त्यामुळे आजूबाजूच्या मंडळींनाही चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. मोठ्या प्रमाणात रोज आर्थिक उलाढाल होत असल्याने या भागात नेतागिरीच्या आड दलाली करणारे, गुंडगिरी करणारे कारखानदारांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी वसुली करतात. खंडणी दिली नाही तर मारहाण करतात. अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी देतात. कुणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर हल्ले करतात. कुख्यात राधेने काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे कारखानदाराकडून बोलून खंडणी देण्यास मज्जाव करणाच्या तरुणाची हत्या केली होती. त्यानंतर या भागातील नागरिकांचा रोष प्रचंड वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अजादुल खान इस्लाम खान (वय ३२, रा. तांडापेठ) यांनी पाचपावली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. आरोपी समीर, शुभम ऊर्फ झिंग्या, राधेशाम ऊर्फ राधे आणि निशांत यांनी कारखाना चालवायचा असेल तर दोन हजार रुपये द्यावे लागेल, असे म्हणून खंडणी दिली नाही तर जीवे मारू, अशी धमकी दिली. १२ ते १५ एप्रिल दरम्यान वारंवार धमकी दिल्याचे खान यांनी तक्रारीत नमूद केले. त्यावरून पाचपावलीच्या उपनिरीक्षक एम. एम. मोकाशे यांनी गुन्हा नोंदविला आहे. (प्रतिनिधी)
खंडणी मागणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: April 29, 2016 03:10 IST