नागपूर : कस्तूरचंद पार्कचा गौरव परत आणण्यासाठी ठोस योजना तयार करा आणि यासंदर्भात तातडीने बैठक घ्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महानगरपालिकेच्या हेरिटेज संवर्धन समितीला दिला.
याविषयी उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, हेरिटेज संवर्धन समितीने प्रतिज्ञापत्र सादर करून उच्च न्यायालयाने आतापर्यंत दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, कस्तूरचंद पार्क मैदान व तेथील स्मारकाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. त्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यावरून कस्तूरचंद पार्कच्या विकासाची योजना तयार करण्यात येईल. याकरिता १८ फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे, असेही न्यायालयाला सांगण्यात आले. त्यावर न्यायालयाने कस्तूरचंद पार्कच्या विकासाकरिता तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आणि १८ फेब्रुवारीची बैठक आणखी लवकर आयोजित करून ठोस योजना तयार करा, असा आदेश दिला. देखभाल व दुरुस्तीअभावी कस्तूरचंद पार्कवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. मैदानावरील स्मारक जीर्ण झाले आहे. ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी न्यायालय मित्र म्हणून तर, ॲड. जेमिनी कासट यांनी मनपातर्फे कामकाज पाहिले.