नागपूर : देशाच्या शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. देशाच्या प्रगतीत विधी शाखेचे मोलाचे योगदान आहे. यापूवीर्ही विधी शाखेने देशाला मोठे नेतृत्व दिले आहे. त्यामुळे या व्यवसायाकडून देशाला बऱ्याच मोठ्या अपेक्षा आहेत. ही बाब लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी समाजहिताला डोळ्यासमोर ठेवले पाहिजे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या विधी शाखेतर्फे ‘लॉ व्हीजन २०१५’ या विधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.सी.पवार, महाविद्यालय विकास संचालक डॉ. मालती रेड्डी हे प्रामुख्याने उपस्थित होते. संविधानाच्या माध्यमातून समाजात आर्थिक आणि सामाजिक समानता येणे हे बाबासाहेबांचे ध्येय होते. विधी शाखेने नेहमी बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाचे पालन केले. विद्यार्थ्यांनी समाजहित डोळ्यासमोर ठेवूनच या क्षेत्रात प्रवेश करावा. जागतिकीकरणाच्या युगात विधी शाखेतील विद्यार्थ्यांसमोर मोठ्या संधी आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:चा विकास करावा. मेहनत, सातत्य आणि मोठे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या व्यवसायात यावे, असे आवाहन न्या.गवई यांनी केले.यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे यांनीदेखील मार्गदर्शन केले. विधी शाखेचा विस्तार होत असून यामुळे हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी ‘चॅलेंजिंग’ झाला आहे. प्रास्ताविक डॉ. पी.सी. पवार यांनी केले. संचालन रसिका बांगरे आणि लक्ष्मी कुकडे यांनी केले. यंदा या महोत्सवात १४ महाविद्यालयांनी सहभाग घेतला आहे. महोत्सवादरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘मूट कोट’ स्पर्धादेखील महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
विधी शाखेकडून देशाला मोठ्या अपेक्षा
By admin | Updated: February 13, 2015 02:30 IST