लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणूक सहा महिन्यांवर आल्याने काही नगरसेवक कमालीचे सक्रिय झाले आहेत. २५-३० लाखांऐवजी ३ लाखांपर्यंतच्या कामासाठी आग्रह धरत आहेत. यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. साडेचार वर्षात प्रभागाकडे फिरकले नाहीत. त्यांनाही अचानक विकास साधावयाचा आहे. प्रभागातील अंतर्गत सिमेंट रस्ते, नाल्या, सिवरेज लाईन अशी कामे अडीच ते तीन लाखांत होत नाही. २० ते ३० लाखांची कामे असल्याने यासाठी निविदा काढाव्या लागतात. निविदा न काढता कोटेशनवर कामे करता यावी. यासाठी एकाच कामाचे तुकडे करून तीन-तीन लाखांच्या फाईल बनविल्या जात आहेत. अशी कामे मर्जीतील कंत्राटदाराच्या माध्यमातून केली जात आहेत. कोटेशनवर कामे करता यावी, यासाठी मंजूर कामांचे तुकडे पाडण्यासाठी आग्रह धरला जात आहे. यातून नगरसेवक व पदाधिकारी, अधिकाऱ्यांत वाद वाढला आहे.
दीड लाखाच्या कामासाठी तीन लाख मंजूर
काही वजनदार नगरसेवकांचे नातेवाईक कंत्राटदार आहेत. त्यांच्या माध्यमातून गट्टू लावणे, नाली दुरुस्ती, फूटपाथ अशा लाख-दीड लाखाच्या कामासाठी झोन स्तरावर तीन-तीन लाखाचा निधी मंजूर केला जात असल्याच्या लक्ष्मीनगर झोनमध्ये तक्रारी आहेत.
मागासवर्गीय वस्त्यातील कामात अनियमितता
दुर्बल घटकांसाठी तरतूद असलेल्या ३५.६९ कोटींच्या निधी वाटपावरून नगरसेवकांत नाराजी आहे. काही नगरसेवकांनी मागासवर्गीय वस्त्यात एकाच कामाचे तुकडे करून अनेक फाईल मंजूर केल्या आहेत. कंत्राटदारांना हाताशी धरून आपल्या प्रभागात यातून ६० ते ७० लाखांचा निधी पळविला असल्याचा आक्षेप आहे.
....
मंजूर कामांना स्थगिती मिळण्याची चर्चा
नियमात बसत नसलेल्या कामांना मोठ्या प्रमाणात मंजुरी देण्यात आली आहे. त्यात निधी वाटपात अन्याय होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे. विरोधीपक्ष नेते तानाजी वनवे, नेहा निकोस, परसराम मानवटर, आयशा उईके, बसपाचे गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तक्रारीनुसार प्रशासनाकडून अशा कामांना स्थगिती मिळणार असल्याची मनपात चर्चा आहे.