कळमेश्वर : औद्योेगिक वसाहतीचा संपर्क असलेल्या कळमेश्वर तालुक्यात गत वर्षभरात २४०५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. ४३ जणांचा मृत्यू झाला. तालुक्यातील ग्रामीण भागात संक्रमणाचा वेग अधिक वाढला आहे. ग्रामस्थांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे करण्यात येत असलेले उल्लंघन संक्रमण वाढीचे प्रमुख कारण ठरले आहे. तालुका प्रशासनही गत दोन महिन्यात यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे.
तालुक्यात गत १५ दिवसात २१५ नागरिक बाधित झाले. गतवर्षी ग्रामीण भागात संक्रमणाचा वेग कमी होता. ग्रामपंचायतस्तरावर आखण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे हे शक्य झाले. मात्र लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील अर्थचक्र बिघडले. वर्षभर घरी बसलेले युवक डिसेंबरच्या अखेर रोजगारासाठी बाहेर पडले. यातच निष्काळजीपणा भोवला. त्यामुळे बाधितांचा ग्राफ एकदम वाढला. खेड्यात अनेकदा सूचना देऊनही ग्रामस्थांचा विनामास्क वावर सुरू आहे. मार्च २० ते मार्च २१ या काळात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रात १२,२१० तर ग्रामीण भागात १३,९५२ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
गत ११ दिवसात कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात १८४९ नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली. तर ग्रामीणमधील गोंडखैरी, मोहपा, धापेवाडा, तिष्टी या चार आरोग्य केंद्रावर ही संख्या १३०५ इतकी आहे. या चारही केंद्रावर आठवड्यातून तीन दिवस लसीकरण करण्यात येत आहे.
-
लसीकरण मोहीम सुरू असून ज्येष्ठ नागरिकांनी व ४५ वर्षांवरील आजारी व्यक्तींनी लस घ्यावी. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. तसेच सर्दी, खोकला, ताप असल्यास नागरिकांनी त्वरित चाचणी करून घ्यावी.
- सचिन यादव
तहसीलदार, कळमेश्वर
----------
फेरीवाले, दुकानदार, सलून व्यवसायी, हॉटेल चालक, भाजीपाला विक्रेत्यांनी व त्यांच्याकडे काम करणाऱ्या प्रत्येकाने कोरोना चाचणी करावी. विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच मास्कचा वापर करावा. अन्यथा नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- स्मिता काळे, मुख्याधिकारी
नगर परिषद, कळमेश्वर-ब्राह्मणी