कळमेश्वर : गतवर्षी लॉकडाऊनमुळे अनेक विवाहसमारंभ रद्द झाले आहे. त्यामुळे यंदा तरी विवाह पार पडतील, अशी आशा बाळगून असलेल्या उपवर-वधूंचा हिरमोड होताना दिसतो आहे. यंदा मार्च ते जून या काळात लग्नाचे मुहूर्त आहेत. मात्र फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विवाह समारंभांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे वर-वधू पक्षाच्या आनंदावर विरजण आले आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात लग्नकार्य असल्याने अनेकांनी डिसेंबर महिन्यात मंगल कार्यालय आणि लाॅनचे बुकिंग केले होते. यासोबत लग्नपत्रिकांचे मित्र परिवार आणि नातेवाइकांना वाटप केले होते. मात्र फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून लग्नसमारंभांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी मंगल कार्यालयाचे बुकिंग रद्द केले आहे. ग्रामीण भागात काहींनी घराच्या घरी ठरावीक लोकांच्या उपस्थितीत विवाह उरकले. त्यामुळे कॅटर्स, मंडप डेकोरेशन, बॅण्ड बाजा पार्टी यांच्यासह या समारंभाशी संबंधित अनेक लोकांचा रोजगारही बुडाला आहे. गतवर्षीच्या लॉकडाऊनमुळे उपरोक्त क्षेत्रातील अनेकावर उपासमारीची पाळी आली होती. यंदाही तीच स्थिती निर्माण होताना दिसत आहे. अशा वेळी या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्यांंना सरकारने मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.
विवाह समारंभांना कोरोनाचे विघ्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:09 IST