वाडी : प्राथमिक आराेग्य केंद्र व्याहाड (पेठ) अंतर्गत येणाऱ्या शिवा (सावंगा) येथील ॲलाेपॅथी दवाखान्यात काेराेना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. या लसीकरणाला ज्येष्ठ नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, आजवर १०० नाेंदणीकृत नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. सत्यवान वैद्य यांनी दिली.
शिवा येथील सरपंच रेखा गावंडे, बाजारगावचे सरपंच तुषार चौधरी, सावंगा येथील सरपंच प्रवीण पानपते, उपसरपंच ज्ञानेश्वर वाठ, प्रकाश भोले, सचिव संजीव भोंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. ही लसीकरण माेहीम वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यवान वैद्य व डॉ. समीर चौधरी यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात राबविली जात आहे. शासन निर्णयानुसार वृद्ध नागरिकांनी ॲपवर नाेंदणी केल्यानंतर त्यांना लस दिली जाते. या आराेग्य केंद्रात वृद्धांसाठी निरीक्षण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. लस दिल्यानंतर त्यांना काही काळ डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवले जाते. त्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली जाते. पहिल्याच दिवशी १०० ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती डाॅ. सत्यवान वैद्य यांनी दिली. या कार्यासाठी आरोग्यसेवक राजेंद्र महल्ले, लसीकरण सेविका लता माहुले, ज्योती दुबे, आशासेविका, आरोग्य कर्मचारी सहकार्य करीत आहे.