शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना, महाराष्ट्र दिन आणि आरोग्यविषयक संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:06 IST

पहिल्या विश्वयुद्धापूर्वी प्लेग आणि त्यानंतर जगभरात पसरलेल्या स्पॅनिश फ्लूचा जीवघेणा थरार इतिहासाने अनुभवला आहे. युद्धाशिवाय मोठ्या संख्येने झालेला जनसंहार, ...

पहिल्या विश्वयुद्धापूर्वी प्लेग आणि त्यानंतर जगभरात पसरलेल्या स्पॅनिश फ्लूचा जीवघेणा थरार इतिहासाने अनुभवला आहे. युद्धाशिवाय मोठ्या संख्येने झालेला जनसंहार, जग नेतृत्वाला वठणीवर आणणारा आणि जगाला भविष्यवेधी आरोग्य व्यवस्थेचे नवप्रारूप अमलात आणण्यास बाध्य करणारा ठरला. दरम्यान संसर्ग, संक्रमण आणि नवनवे आजार येतच राहिले. उपचार संशोधनही सुरू राहिले. एकापाठोपाठ नवनवे संक्रमण यावे, त्यावर अस्त्र-शस्त्रांचे उपचार सिद्ध व्हावे, असे हे चक्र अव्याहत सुरू आहे. इबोला, सार्स आदींसारखे संक्रमण जीवघेणे होते. अनेक देशांनी या संक्रमणांचा ज्वर भोगला. त्याची तितकीशी झळ भारताला बसली नाही आणि म्हणून भारत सरकार, भारतीय नागरिक आणि वैद्यकीय यंत्रणा निश्चिंत राहिल्या. भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती जगात सर्वोत्तम आहे, या तोऱ्यात आपल्या यंत्रणा वावरत राहिल्या. भ्रमाचा हा भोपळा सार्स-२ अर्थात कोविड-१९ अर्थात या कोरोना विषाणू संक्रमणाने तोडला आणि १४० ते १४५ कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताच्या वैद्यकीय व्यवस्थेचे, शासन यंत्रणेचे धिंडवडे चव्हाट्यावर आले. भारतच कशाला, वैद्यकीय क्षेत्रात अग्रमानांकित असलेल्या इटली, अमेरिका यांसारख्या देशांची दुरवस्था या कोरोना विषाणूने केली आहे. पहिल्या लाटेत भारतीय शासनाच्या कठोर धोरणांनी बऱ्यापैकी अंकुश लावण्यात यश आले. अन्यथा पहिल्या लाटेतच भारत अवसान गळाल्यासारखा झाला असता, हे कोणीही नाकारू शकत नाही. दुसऱ्या लाटेत मात्र ती भीती निर्माण झाली आहे. या दोन्ही लाटांमध्ये सर्वाधिक बाधित ठरत आहे तो महाराष्ट्र आणि अशाच पार्श्वभूमीवर सलग दुसरा महाराष्ट्र दिन अर्थात महाराष्ट्र स्थापनेचा वर्धापन दिन साजरा होत आहे. संस्कृती, भाषाभिमान, क्षेत्रफळ आणि भौतिक अस्तित्वाचा हा सोहळा साजरा करत असताना आत्मिक समाधान मात्र दूरवर दिसत नाही, ही वास्तविकता आहे.

तसे पाहिले तर ऐतिहासिक संपूर्णतेसह आधुनिक विकासाची चकाकी असणारा महाराष्ट्र हा देशात अव्वल ठरतो. नेतृत्वाला दिशा दाखविण्याची धमक महाराष्ट्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराज असोत, महात्मा फुले असोत, लोकमान्य टिळक असोत, स्वातंत्र्यवीर सावरकर असोत की डॉ. बाबासाहेब आंबेडकर असोत... यांचे आणि इतर महापुरुषांचे विचार जगाला आजही मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे भविष्यवेधी धोरण कसे असेल, हे महत्त्वाचे ठरते.

शासन, प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्र

गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त दिसून येत आहे. चाचण्या असोत की उपचार, या सर्वात महाराष्ट्र अग्रस्थानी असला तरी बाधित आणि मृतांच्या संख्येतही महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. सर्व हॉस्पिटल्स रुग्णांनी फुल्ल आहेत, औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे, शासन-प्रशासन स्तरावरून सर्वसामान्यांना आधार देण्यात अपयश येत आहे. उपचाराअभावी लोक रस्त्यावरच मरून पडत आहेत, अशी दैनावस्था आहे. ही दैनावस्था अराजकतेकडे कधी वळेल हे सांगता येत नाही. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय तोकडी पडत आहे. या सर्व अडचणींतून कसे पार व्हायचे, हा प्रश्न आहे.

घरोघरी हॉस्पिटल

कोरोना संक्रमणामुळे सर्व हॉस्पिटल्स, कोविड केअर सेंटर्स भरलेले आहेत. बेड्ससाठी मारामारी सुरू आहे, वेटिंग लिस्ट लागली आहे. एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला किंवा संभवत: तो बरा होऊन घरी गेला तरच बेड दुसऱ्याला प्राप्त होत आहे. खासगी हॉस्पिटल्समध्ये उपचाराच्या नावाखाली लाखो रुपये डिपॉझिट मागितले जात आहेत. हॉस्पिटल मिळालेच तर दिवसाचा खर्च २०-२५ हजार रुपये येत आहे. ऑक्सिजन सिलिंडर असो वा औषधांच्या किमती दहा पटीने वाढविण्यात आल्या आहेत. अनेक रुग्ण ऑक्सिजन मास्क लावून हॉस्पिटलच्या शोधात रुग्णवाहिकेत तासनतास इतस्तत: भ्रमंती करत आहेत आणि तेथेच अखेरचा श्वास घेत आहेत. अशा स्थितीत काहींनी घरीच प्राथमिक सुविधा निर्माण करून हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात अनेकांना यशही आले आणि खर्चही वाचला आहे. भविष्यात मध्यमवर्गीय आणि जे घर बांधू शकतात अशांसाठी ही स्थिती जणू एक इशाराच आहे. घरात एक खोली पूर्णत: प्रथमोपचारासाठी वाहिली असावी आणि आपात्काळासाठी घरच्या घरीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन रुग्णाला वाचविण्याची क्षमता निर्माण करावी लागणार आहे. यात ऑक्सिजन सिलिंडर व बेसिक औषधे कायम असणे गरजेचे ठरणार आहे.

शालेय शिक्षणात प्रथमोपचार

वर्तमान स्थितीचा अनुभव घेता डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची प्रचंड उणीव भासत आहे. काही खासगी हॉस्पिटल्सनी ऐन वेळेवर नवकर्मचाऱ्यांची भरती करत जुजबी ट्रेनिंग देऊन कोविड सेंटर्समध्ये त्यांना रुजू केले आहे. हे किती योग्य आणि धोक्याचे, याचे विश्लेषण करण्यापेक्षा वेळ साधली जाणे, सद्य:स्थितीत महत्त्वाचे ठरत आहे. हाच विचार करता, ज्या प्रमाणे सैनिकी शिक्षण शालेय जीवनापासून सक्तीचे करावे, असा एक वर्ग अनेक वर्षांपासून आग्रही आहे त्याचप्रमाणे आता शालेय शिक्षणात वैद्यकीय शिक्षण सक्तीचे असावे, याचे संकेत कोरोना महामारीने दिले आहे. आपल्याकडे आयुर्वेद, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, युनानी असे विविध वैद्यकीय उपचार आहेत. या प्रत्येक पॅथीचे प्राथमिक शिक्षण शालेय जीवनातच मिळाले तर भविष्यात अशा आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यास भारताला कठीण जाणार नाही. महाराष्ट्र या बाबतीत पुढाकार घेण्यास सक्षम आहे.

आपत्काळात सज्जता

आपत्काळ हा कोणत्याही क्षणी थरारक अनुभव असतो. महापूर, भूकंप, जातीय दंगली यासाठी प्रशासन कायम सज्ज असते. मात्र, अशावेळी संवेदनशीलता, संयमाची चुणूक सर्वसामान्यांमध्ये भरणे गरजेचे असते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ही चुणूक दिसून आली. दुसऱ्या लाटेत ही चुणूक नामशेष ठरल्याचे दिसून येत आहे. भयंकर अशा संक्रमणाच्या अवस्थेतही व्हॉट्सॲप चिंतकांचा फूत्कार मोठ्या प्रमाणात झाला आहे. आपत्काळात अशा फूत्कारापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरून जमेल ते करणे अपेक्षित असते. रामसेतूच्या बांधकामात इवल्याशा खारूताईचे योगदान सर्वश्रेष्ठ ठरले होते. आपत्काळात अशा योगदानासाठी सज्ज राहणे, हेच मराठी संस्काराचे बळ आहे, हे समजून घ्यावे.

- प्रवीण खापरे

७५०७७७५८९७

...........................