लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज ही अत्यावश्यक सेवा असून, महावितरणकडून कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा सुरळीत व अखंडित ठेवण्यात येत आहे. मात्र कोरोनाच्या या खडतर काळात योद्धा म्हणून कर्तव्य बजावताना विदर्भात कोरोनामुळे आतापर्यंत महावितरणच्या २१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महावितरणच्या नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्याला प्राधान्य द्यावे तसेच कोविड प्रतिबंधक लस ताबडतोब घ्यावी, असे आवाहन नागपूर प्रादेशिक विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी केले आहे.
महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागातील १२ कर्मचारी संघटनांच्या सुमारे ४५ पदाधिकाऱ्यांशी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील आवाहन केले. मार्च २०२० ते एप्रिल २०२१ पर्यंत नागपूर प्रादेशिक विभागात १,३१७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी ६५९ कोरोनामुक्त झाले असून, सद्यस्थितीत ६३७ कर्मचारी रुग्णालय व घरी उपचार घेत आहेत तर, २१ सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट ही सर्व वयोगटासाठी मोठी धोकादायक आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी तसेच ग्राहकसेवेचे कर्तव्य बजावताना आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य द्यावे. नागपूर प्रादेशिक विभागातील नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २५ टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. येत्या १५ दिवसात जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे कोरोना नियमाचे काटेकोर पालन करून वेगाने करावीत, असे निर्देश सुहास रंगारी यांनी या बैठकीत दिले.