नागपूर : कोरोना लॉकडाऊनमध्ये हॉटेल व्यवसाय आठ महिने बंद होता. त्यानंतर सुरू झालेला हा व्यवसाय अजूनही कोरोना प्रभावाखाली आहे. नागपुरात हॉटेल्समध्ये ५० टक्के खोल्या रिक्त असून, त्याचा व्यावसायिकांना फटका बसत आहे. हा व्यवसाय सुरळीत होण्यासाठी आणखी सहा महिने लागतील, अशी प्रतिक्रिया हॉटेल व्यावसायिकांनी दिली. याकरिता शासनाने लहान हॉटेल व्यावसायिकांना विशेष पॅकेज आणि वीजबिल औद्योगिक क्षेत्राप्रमाणे आकारावे, अशी मागणी हॉटेल व्यावसायिक संघटनेची आहे.
नागपुरात ३०० पेक्षा जास्त मध्यम आणि १० पेक्षा जास्त मोठे तारांकित हॉटेल्स आहेत. याशिवाय ५००पेक्षा जास्त लॉज आहेत. कोरोनापूर्वी या सर्वांकडे ६० ते ७० टक्के ग्राहक यायचे. पण आवश्यक कामांसाठी नागपुरात येणारे कॉर्पोरेट आणि मोठ्या कंपन्या तसेच शासकीय अधिकारी मोठ्या हॉटेल्समध्ये थांबत आहेत. त्यामुळे केवळ मोठ्या हॉटेल्समध्ये ५० टक्के, तर लहान हॉटेल्समध्ये ३० टक्के ग्राहक असल्याची माहिती हॉटेल्स व्यावसायिकांच्या सर्वेक्षणात पुढे आली आहे.
प्रवासी कमी; पण खर्च तेवढाच
हॉटेलमध्ये प्रवाशांची संख्या कमी असली तरीही संचालनासाठी लागणारा खर्च पूर्वीसारखाच आहे. कर्मचारी, विजेचे बिल, साफसफाई खर्चही तेवढाच येत आहे. त्यामुळे हॉटेल्स व्यवसायावर आर्थिक संकट आहे. या व्यवसायाला सुगीचे दिवस येण्यासाठी आणखी सहा ते आठ महिने लागेल, असे संचालकांनी सांगितले.
प्रवाशांची संख्या वाढली
लॉकडाऊनच्या तुलनेत सध्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. पूर्वीच्या २० टक्क्यांच्या तुलनेत ५० टक्क्यांवर आली आहे. कॉर्पोरेट प्रवासी वाढल्याने पूर्वीच्या तुलनेत स्थिती चांगली आहे. प्रशासनाने रेस्टॉरंटची वेळ रात्री १ पर्यंत वाढवावी.
जसबिरसिंग अरोरा, व्यवस्थापकीय संचालक, हॉटेल सेंटर पॉइंट समूह.
लहान हॉटेल सर्वाधिक संकटात
पूर्वीच्या तुलनेत प्रवाशांची संख्या वाढली असली तरीही हॉटेल संचालनाचा खर्च परवडत नाही. प्रवासी रेल्वे, विमानाच्या तुलनेत रस्ते मार्गाने तसेच वैद्यकीय उपचारासाठी अन्य राज्यातून लोक येत आहेत. लहान हॉटेल सर्वाधिक संकटात आहेत. झूम बैठकांमुळे कंपन्यांचे अधिकारी नागपुरात येत नाहीत. पुढे प्रवासी वाढेल, अशी अपेक्षा आहे.
तेजिंदसिंग रेणू, अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल असोसिएशन.